लातुरात हत्याकांड; नवरा बायकोच्या भांडणात दोघांचा बळी

नवरा बायकोमधील वाद विकोपाला गेल्याने दोन जणांना जीव गमवावा लागला. लातूर शहरातील भांबरी चौकात बुधवारी हे दुहेरी हत्याकांड घडले आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले. मात्र, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तिघांना ताब्यात घेतले आहे.

लातूर शहरातील भांबरी चौकात भीमा चव्हाण आणि ललिता चव्हाण हे दाम्पत्य राहते. त्यांच्यामध्ये कुरबुरी होत असतात. अनेक दिवसांपासून हे सुरू आहेत. भीमा चव्हाण हे लातूर एमआयडीसीमध्ये मजुरी करतात. तर ललिता या चहाची टपरी चालवतात. त्यांना दोन मुली, दोन मुले आहेत. दरम्यान, २८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी दोघांमध्ये वाद सुरू झाला. भांडण विकोपाला गेल्याने ललिता चव्हाण यांनी त्यांचा भाऊ बालाजी राठोड यांना फोन करून बोलावून घेतले. बालाजी राठोडने मित्र आणि नातेवाईकांसह लातूर गाठले. याची माहिती कळताच भीमा चव्हाण यांनी वरवंटी या गावातून आपल्या नातेवाईकांना बोलावून घेतले. यात त्यांचा भाचा आनंद आणि पुतण्या अरूणही होता.

भांबरी चौकातील चव्हाण यांच्या घरासमोर दोन्हीकडील नातेवाईकांमध्ये वादविवाद सुरू झाला. वाद विकोपाला जाऊन हाणामारी सुरू झाली. यावेळी भीमा चव्हाण यांचा पुतण्या आनंद आणि भाचा अरूण यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. चाकूने वार करण्यात आल्यामुळे दोघे जागीच मरण पावले. तर आरोपी पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच लातूर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत घटनेत सहभागी असलेल्या दोन-तीन आरोपींना ताब्यात घेतले. उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची तीन पथक तयार करण्यात आली आहे. तर दोघांचे मृतदेह लातूर येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *