वृद्धांना एकटे गाठून संभाषण कौशल्याने त्यांना लुटणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश

मुंबई पोलिसांना दागिने हिसकावून पळणाऱ्या सोनसाखळी चोरांवर अंकुश मिळविल्यात काही प्रमाणात यश आले असले तरी तोतयेगिरी मात्र प्रचंड वाढली आहे. महिला आणि वृद्धांना एकटे गाठून संभाषण कौशल्याने त्यांना लुटणाऱ्या एका टोळीचा चारकोप पोलिसांनी पर्दाफाश केला. या टोळीतील तिघांना अटक करण्यात आली आहे. हे तिघेही दिल्लीचे असून खास याच कामासाठी मुंबईत येत असत.

कांदिवली, बोरिवली परिसरात महिला आणि वृद्धांना भर रस्त्यात फसविण्याचा घटना गेल्या काही दिवसांपासून वाढल्या होत्या. त्यामुळे या तोतयांना पकडण्यासाठी पोलिस कामाला लागले होते. त्यातच नवी दिल्लीहून खास याच कामासाठी मुंबईत एक टोळी येत असून ही टोळी बोरिवली स्थानकात उतरणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज असल्याने त्यावरून चारकोप पोलिसांच्या पथकाने बोरिवली स्थानकावर सापळा रचून राजकुमार मालावत, आशू राजकुमार मालावत, सुनील जनरेलसिंग राजपूत या तिघांना ताब्यात घेतले. तिघांची कसून चौकशी केली असता त्यांचा चारकोप, एमएचबी कॉलनी, बोरिवली आणि कस्तुरबा मार्ग पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे उघड झाले. पोलिसांनी आरोपींना दिल्ली येथे नेऊन झाडाझडती घेतली त्यावेळी चोरीचे सुमारे सात लाखांचे दागिने सापडले. चोरीच्या दागिन्यांसाठी या कामासाठी वापरण्यात येणारी दुचाकीही पोलिसांनी हस्तगत केली.

मंदिरात जाणाऱ्या महिला, फिरण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी एकटे बाहेर पडलेले वृद्ध यांना हे तोतये लक्ष्य करतात. कधी पोलिस असल्याची बतावणी तर कधी वेगळेच कारण सांगून त्यांचे लक्ष विचलित करतात. नाकाबंदी आहे, पुढे हत्या झाली आहे अशी वेगवेगळी कारणे सांगून दागिने पिशवीत किंवा रुमालात ठेवण्यास सांगून हातचलाखी करून ते काढले जात.

हे ध्यानात ठेवा…

दागिन्यांचे प्रदर्शन करू नये

महिला आणि वृद्धांना दागिने घालून एकटे पाठवू नये

कारणे कोणतीही असोत अंगावरील दागिने काढून देऊ नयेत

बँकेत कुणीतरी सोबत जावे

अनोळखी व्यक्तीशी जास्त वेळ रस्त्यात बोलू नये

कुणी अडविल्यास आजूबाजूच्या पादचाऱ्यांना जमा करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *