शिकवणीत शिक्षकाचे विद्यार्थिनींशी अश्लील चाळे

शिकवणीदरम्यान दोन विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अंबाझरी पोलिसांनी गजाआड केले. शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडविणारी ही घटना शनिवारी सायंकाळी अंबाझरी भागात घडली. ज्ञानेश्वर बळीराम नाडेकर (वय ४८, रा. प्लॉट नं. ४८,रा. दाभा),असे अटकेतील शिक्षकाचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर नाडेकर हा एका शाळेत कंत्राटी शिक्षक असून, तो होम ट्युशन देतो. अंबाझरी भागातील ९ वर्षीय दोन चुलत बहिणींना नाडेकर हा ‘होम ट्युशन’ देतो. शिकवणीदरम्यान तो दोघींशी अश्लील चाळे करायला लागला. याबाबत कुणाला सांगितल्यास आई-वडिलांना ठार मारेल, अशी धमकी त्याने दोघींना दिली होती. त्यामुळे दोघीही दहशतीत होत्या. शनिवारीही त्याने विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केले. दोघी प्रचंड घाबरल्या. नातेवाइकांनी त्यांच्याकडे आस्थेने चौकशी केली. नाडेकर हा अश्लील चाळे करीत असल्याचे दोघींनी नातेवाइकांना सांगितले. नातेवाइकांनी नाडेकरला घरी बोलाविले. तत्पूर्वी नातेवाइकांनी पोलिस नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली. नियंत्रण कक्षाने अंबाझरी पोलिसांना कळविले. अंबाझरी पोलिस पीडित विद्यार्थिनींच्या घरी पोहोचले. नाडेकर हा तेथेच होता. पोलिसांनी त्याला अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *