महापूराच्या दणक्याने अनेक भले बुरे अनुभव पहायला मिळाले. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदतीसाठी हजारो हात सढळपणे पुढे सरसावले. समाजाने आपली संवेदनशीलता अधिक जपण्याचा प्रयत्न केला. समाजातील विविध जाती-धर्माच्या लोकांनी भरभरुन दिलेल्या या सत्पात्री दानांमुळे देशाची राष्ट्रीय एकात्मता कायम असल्याचे दाखवून दिले. मिरजेतील ख्वाजा शमना मिरासाहेब गर्ग्यात १८०० पूरग्रस्तांची सोय करण्यात आली होती.
सकाळी उठल्यावर लागणार्या टूथपेस्टपासून ते रात्री झोपण्यासाठी लागणार्या अंथरूण, पांघरून, रोजचे कपडे आदि सर्व सोय करण्यात आली. सकाळी चहा, नाष्टा, दुपारी जेवण, संध्याकाळी चहा, रात्री जेवण, लहान मुलांना दूध अशी अगदी घराच्या कुटुंबात असते इतकी चांगली सोय येथे करण्यात आली होती. विशेष म्हणजे पूरग्रस्त घरी जाण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कोणाचीही, कसलीही गैरसोय झाली नाही. ख्वाजा शमना मिरासाहेब दर्ग्यात दर्गा जमातचे सर्व कमिटी सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १००-१२५ युवा कार्यकर्ते आपले काम बाजूला ठेवून अहोरात्र राबत होते. सांगली, कर्नाळ रस्ता, मगरमच्छ कॉलनी, मिरजेतील कृष्णा घाट, शिरोळ तालुक्यातील कनवाड, आलास, बुबनाळ, जुगुळ आदी गावांतील पूरग्रस्त रहायला होते. यां दरम्यानच्या काळात बकरी ईद सणादिवशी सुमारे तीनशे लिटर शिरखुर्मा करून या पूरग्रस्तांच्या समवेत बकरी ईद साजरी केली. १५ ऑगस्ट रोजी सर्वांना जिलेबी वाटप करण्यात आले. शेवटच्या दिवशी, घरी जाताना पंधरा दिवस पुरेल इतक्या पंधरा संसारिक उपयुक्त वस्तूंचे कीट देण्यात आले. घरी परतताना अनेकांचे डोळे पाणावले.
याकामी हिंदू-मुस्लिम समाज बांधवानी सढळ हाताने सर्व प्रकारची मोलाची मदत केली. सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, आमदार जयंत पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, शहर अधिक्षक संदीपसिंह गिल, निरीक्षक राजू ताशीलदार, उपायुक्त स्मृती पाटील, सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे, सर्व प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, संस्था आदिंनी भेट देऊन समाधान व्यक्त केले.
