पूरहाल पाहून शर्मिला ठाकरे यांना अश्रू अनावर

सांगली, कोल्हापूरमधील पूर ओसरला असला तरी तेथील दु:ख व दैन्य अजूनही कायम आहे. पूरग्रस्तांची दयनीय अवस्था हेलावून टाकणारी आहे. सांगलीतील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेयांना आज तेथील परिस्थिती पाहून अश्रू अनावर झाले.

 मनसेच्या वतीनं पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी शर्मिला ठाकरे यांनी आज सांगलीतील ब्रह्मनाळ गावाला भेट दिली. माजी आमदार नितीन सरदेसाई व अन्य पदाधिकारी त्यांच्यासोबत होते. ब्रह्मनाळ गावातील अनेक नागरिकांच्या त्यांनी भेटीगाठी घेतल्या. ब्रह्मनाळमध्ये बोट उलटून मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांचीही त्यांनी विचारपूस केली. यावेळी लोकांचे उद्ध्वस्त संसार पाहून त्या भावूक झाल्या. त्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत.

मीडियाशी संवाद साधताना त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ‘सांगलीतील परिस्थिती खूप वाईट आहे. इथं केवळ मदतीची गरज नाही. आख्खीच्या आख्खी कुटुंबं उभी करण्याची गरज आहे. माणसं उभी करण्याची गरज आहे. वैयक्तकरित्या व खासगी संस्था, संघटनांच्या मदतीनं छोटी-छोटी कामं होऊ शकतात. मात्र, घर बांधण्यासारखी, शेती उभी करण्यासारखी मोठी कामं सरकारनं करायला हवीत,’ असं त्या म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *