कोठडीत असलेल्या पाच आदिवासी आरोपींना पोलिसांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांनी पाणी मागितल्यावर पोलिसांनी लघवी पाजल्याची घटना उत्तर प्रदेशातील अलिराजपूर जिल्ह्यात घडली आहे. या पाच जणांवर पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. याप्रकरणात पोलीस ठाणे प्रमुखासह चार पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
अलिराजपूर जिल्ह्यातील नानपूर पोलिसांनी पाच आदिवासी तरुणांना अटक केली होती. आरोपींपैकी एकाच्या बहिणीसोबत एक तरुण छेडछाड करीत होता. आरोपींनी त्याचा पाठलाग केला. त्यामुळे मदतीसाठी तो तरुण पोलीस ठाण्यात आला. तेव्हा आरोपींनी तिथे असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या प्रकरणात त्या तरुणाने पाच जणांविरोधात तक्रार दिली नसली तरी तो घटनास्थळी होता, असा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, कोठडीत असताना पोलिसांनी पाच जणांना बेदम मारहाण केली. यावेळी त्यांनी पोलिसांना पिण्यास पाणी मागितले. पोलिसांनी मात्र त्यांना लघवी पाजली, असा आरोप या पाच जणांनी केला आहे. हे पाच जण आदिवासी असून त्यांना अलिराजपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी अलिराजपूरचे पोलीस अधीक्षक विपूल श्रीवास्तव इंडियन एक्स्प्रेसला बोलताना म्हणाले, पोलिसांनी कोठडीत मारहाण केल्याचे आरोप पाच जणांनी केले आहेत. प्रथमदर्शनी त्यात तथ्य आढळून आले आहे. तीन दिवसांपूर्वी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या शरीरावर जखमाही आढळून आल्या आहेत. या घटनेचा वेगाने तपास करून पोलिसांविरूद्ध कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
