पाऊस थांबला, पूरस्थिती कायम ; वसई-विरारमधील काही भाग अजूनही जलमय

 दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने सोमवारी विश्रांती घेतली असली तरी शहराच्या अनेक भागांतील पाण्याचा निचरा अद्याप झालेला नाही. अनेक रस्ते आणि परिसर पाण्याखाली गेले आहेत. इमारतींच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत पावसाचे पाणी गेल्याने रोगराईचे संकट निर्माण झाले आहे.

या पावसाळ्यात दुसऱ्यांदा वसई-विरारमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. शुक्रवारी रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शनिवार पहाटेपासूनच शहरातील सखल भागांमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली. शनिवारी संध्याकाळी पाण्याची पातळी वाढू लागली. सोमवारी विश्रांती घेतली असली तरी सखल भागांत अजूनही पाण्याचा

निचरा झालेला नाही. अनेक ठिकाणी असलेल्या सोसायटय़ांमध्ये अद्याप पाणी आहे. शनिवार रात्रीपासून या परिसरांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून वीज देण्यात आलेली नाही.

विरारमधील विराट नगर, मयेकर वाडी, चाणक्य चौक या परिसरांतील वीजवाहक तारा तुटल्याने नागरिकांना विजेपासून वंचित राहावे लागत आहे. अनेकांच्या घरांतून अद्याप पाण्याचा निचरा न झाल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. घरातील फर्निचरसह अनेक मौल्यवान सामानांचे नुकसान झाले आहे.

सोसायटय़ांच्या आवारात पाणी गेल्याने गाडय़ांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक नागरिकांना गाडय़ा ढकलत गॅरेजपर्यंत न्याव्या लागल्या. मात्र गॅरेजमध्येही जागा नसल्याने गाडय़ा रस्त्यावर उभ्या करण्यात आल्या आहेत. पावसाचे पाणी इमारतीच्या पिण्याच्या टाकीत गेल्याने पाणी दूषित झालेले आहे. त्यामुळे रोगराईचे नवीन संकट निर्माण झालेले आहे.

वसई-विरारचा पाणीपुरवठा अनियमित

वसई : सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रात (पंपिंग स्टेशन) पाणी घुसले आहे. यामुळे मासवण व धुकटन येथील जलशुद्धीकरण केंद्रे बंद पडली आहेत. यामुळे वसई-विरार भागात होणाऱ्या पाणीपुरवठय़ावर त्याचा परिणाम झाला आहे. केंद्रात घुसलेले पाणी काढण्यासाठी आणि त्या ठिकाणी साचलेला कचरा काढण्याचे काम पालिकेच्या वतीने सुरू करण्यात आले आहे

शहराला पाणीपुरवठा करणारे सूर्या हे महत्त्वाचे धरण आहे. या धरणातून दररोज वसई-विरार शहराला २०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. या पाण्याचा पाणीपुरवठा करणारी जलशुद्धीकरण करण्याची केंद्र मासवण व धुकटन येथे आहेत. मागील चार दिवसांपासून पालघर जिल्ह्य़ात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या भागात असलेले नदी-नाले व सखल भागात असलेल्या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरस्थितीमध्ये जलशुद्धीकरण केंद्रेही पाण्याने वेढली गेली आहेत. तसेच जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाणी जाऊन मोठय़ा प्रमाणात गाळ व इतर कचरा जमा झाला असल्याने वारंवार हे पंप बंद पडू लागले आहेत त्यामुळे शहराला नियमित होणारा पाणीपुरवठा अनियमित झाला असल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत.

अतिवृष्टी झाल्यामुळे पावसाचे पाणी मासवण व धुकटन येथील जलशुद्धीकरण केंद्रात गेले. गाळ व कचरा साचल्याने काही केंद्रे बंद पडली आहेत. त्यामुळे पाणीपुरवठय़ावर परिणाम झाला. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी दुरुस्तीचे कामही युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *