शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एक तलाव भरून वाहायला लागला आहे. चांगल्या पावसामुळे तुळशी तलावातील पाणी ओसंडून वाहू लागले आहे. मागील वर्षी तुळशी तलाव ९ जुलैला भरला होता. यंदा १२ जुलैला तुळशी तलाव भरला आहे. तुळशी तलावाची पाणी साठवण क्षमता ८०४६ दशलक्ष लीटर इतकीच आहे. मुंबई शहराला एका वर्षासाठी एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. तर दररोज ४५०० दशलक्ष लिटरची गरज भासते. मात्र प्रत्यक्षात सातही तलावांमधून ३९०० दशलक्ष लिटर पाणी आणले जाते.
मुंबई आणि शहर परिसरात गेल्या काही दिवसांपूर्वी चांगला पाऊस झाला. या दमदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमधील पाणीसाठ्यात पाच टक्क्यांवरून २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. दरम्यान, सातपैकी एक अर्थात तुळशी तलाव पूर्णपणे भरला आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी दिलादायक बाब आहे.
