गाढी नदीवरील धोकादायक फरशी पूल दुचाकीवरून निष्काळजीपणे ओलांडताना उमरोली गावात राहणारे पती पत्नी नदीत वाहून गेल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या माध्यमातून शोध घेऊनही दोघांचा शोध घेण्यास पोलिसांना अपयश आले.
उमरोली गावातून बाहेर पडण्यासाठी असलेल्या एकमेव मार्ग गाढी नदीतून जातो. या मार्गावर नदीपात्रातून जाणारा अतिशय कमी उंचीचा पुल असल्यामुळे पूर आला की गावात जाण्या येण्याचा मार्ग बंद होतो. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास फरशीपुलावर पाणी वाहत होते. मात्र काही नागरिक पायी जाऊन पूल ओलांडत असल्यामुळे दुचाकीवर आलेल्या आंब्रे दाम्पत्याने दुचाकी थेट प्रवाहात घातली. स्थानिक अनुभवी लोकांनी दुचाकी पाण्यात टाकू नका असा सल्ला दिला होता. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आदित्य आंब्रे (वय ३०) यांनी थेट दुचाकी पाण्यात टाकली. पात्रात प्रवेश करतात काही सेकंदातच पाण्याच्या वेगाने दुचाकीचा तोल गेला आणि दुचाकीसह मागील बसलेली त्यांची पत्नी सरिता आंब्रे (वय २८) दोघेही खाली पडले आणि पाण्याच्या प्रवाहामुळे दुचाकीसह वाहू लागले. सरिता यांनी हात वर करून वाचविण्यासाठी मदत मागितली. स्थानिकांनी प्रवाहात उड्याही मारल्या. मात्र पाण्याच्या प्रचंड वेगाला घाबरून स्थानिक नागरिकांचा हात त्यांना वाचवू शकला नाही. अवघ्या काही मिनिटांत आमच्यासमोर ते वाहून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी नीरज गुप्ता यांनी दिली. स्थानिकांच्या मदतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघेही कुठेच आढळले नाहीत. खोपोली येथील राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला पाचारण करून रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.
