मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस

गेल्या आठवड्यात दाणादाण उडवणाऱ्या मुसळधार पावसानं आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरात जोरदार ‘एन्ट्री’ केली. मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला असून, पश्चिम द्रुतगती मार्गावर दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईसह उपनगरांत काल रात्रीपासूनच पडणाऱ्या पावसाचा जोर आज सकाळपासून वाढला आहे. लालबाग, परळ, गोरेगाव, मिरा रोड, अंधेरी, वांद्रे परिसरात सकाळी जोरदार बरसला. अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली होती. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील वाहतूक सुरळीत असल्याचं सांगण्यात येत असलं तरी काही गाड्या दहा ते पंधरा मिनिटे उशिरानं धावत होत्या. मध्य रेल्वेवरील विक्रोळी ते कांजूरमार्ग स्थानकादरम्यान पाणी साचलं होतं. आता ते ओसरण्यास सुरुवात झाली आहे. बेस्ट वाहतुकीलाही पावसाचा फटका बसला. अनेक मार्गांवरील वाहतूक अन्य मार्गावरून वळवण्यात आली. रस्तेवाहतुकीलाही पावसाचा मोठा फटका बसला. पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. अंधेरी सब-वेमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळं खबरदारी म्हणून पोलिसांनी दोन्ही दिशेला बॅरिकेड्स लावले होते. पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतुकीलाही काही वेळ ‘ब्रेक’ लागला होता. विमान वाहतूकही काही वेळ विस्कळीत झाली होती. मुसळधार पाऊस आणि दृष्यमानता कमी झाल्यानं मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानांची उड्डाणे थांबवण्यात आली होती. नवी मुंबई, ठाण्यातही पाऊस जोरदार बरसला. पुढील २४ तासांत मुंबई आणि उपनगरांत काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *