सुहास सोनावणे यांचे निधन

मुंबईची खडानखडा माहिती असणारे, माहितीचा खजिना असणारे सुहास सोनावणे यांचे शुक्रवारी रात्री आकस्मिक निधन झाले. सुहास सोनावणे हे आंबेडकरी चळवळीत सक्रिय होते.

सुहास सोनावणे हे मागील तीस वर्षांपासून वृत्तपत्रे, मासिकांमध्ये लेखन करत होते. त्याशिवाय जुन्या मुंबईचे अभ्यासक म्हणूनही त्यांची ओळख होती. त्‍या विषयावर त्‍यांनी विविध नियतकालिकांमधून लेखन केले आहे. सुहास सोनावणे यांचे ‘मुंबई-कालची’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे, तर ‘पुसलेली मुंबई’ हे पुस्तक लवकरच प्रसिद्ध होणार आहे. त्यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्‍यांच्या चळवळी’ या विषयाचा अभ्यास केला आहे. त्‍यांनी ‘सत्याग्रही आंबेडकर’, ‘शब्द फुलांची संजीवनी’, ‘ग्रंथकार भीमराव’, ‘बहु आयामी आंबेडकर’, आणि ‘डॉ. आंबेडकर आणि समकालीन’ ही पाच पुस्तके लिहिली आहेत. त्याशिवाय त्यांनी विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांचे दीर्घ काळ स्वीय सचिव म्हणूम काम केले आहे. केरळचे राज्यपाल रा. सु. गवई यांचे स्वीय सचिव म्हणून काम पाहिले.

शनिवारी सकाळी दहा वाजता वरखोना बिल्डिंग, पहिला मजला, कबुतरखान्यासमोर दादर पश्चिम या त्यांच्या राहत्या घरातून सोनावणे यांची अंत्ययात्रा निघणार असून शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती सोनावणे यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *