अर्धा-पाऊण तास वाट पाहिल्यानंतर या लोकलमधील प्रवाशांनी रुळांवर उड्या घेत ठाकुर्ली स्थानक गाठण्यास सुरुवात केली. त्याचवेळी मुंबईच्या दिशेकडून भरधाव एक्स्प्रेस आली. पण, प्रसंगावधान राखत रुळांजवळील जागेचा आसरा घेतल्याने हे प्रवासी बचावले. त्यांच्यात महिला आणि तरुणीही मोठ्या संख्येने होत्या. या घटनेबद्दल लोकांकडून रेल्वेविरोधात चीड व्यक्त होत आहे.
सकाळी १०.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जाणारी पाटणा एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने जात असताना रस्त्यात इंजिन बिघाडामुळे अडकून पडली. या गाडीच्या मागून येणाऱ्या जलद लोकल गाड्या यामुळे अडकून पडल्या. दुरुस्तीसाठी अर्धा तासाहून अधिक वेळ लागल्यामुळे या रखडलेल्या गाड्यांमधील प्रवाशांना रेल्वे रुळांवर उतरून ठाकुर्ली स्थानक गाठण्याचा निर्णय घेतला. धिम्या गाड्या सुरू असल्यामुळे पुढे जाण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. परंतु, त्याचवेळी इतर मेल-एक्स्प्रेस सुरू असल्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता.
ज्येष्ठ नागरिक, महिला, मुली आणि प्रवासी एकमेकांना मदत करत लोकलमधून खाली उतरून निघाले होते. परंतु, त्याचवेळी कल्याण दिशेने एक वेगवान एक्स्प्रेस आली आणि सगळ्यांच्या हृदयाचा ठोका चुकला. काही प्रवासी रेल्वे रुळालगत बसून राहिले. काहींनी रुळांमध्ये झोपून, काहींनी दोन गाड्यांच्या मध्ये बसकण मांडून आपला जीव वाचवला. गाडी निघून गेल्यानंतर प्रवाशांनी रुळांमधून चालत ठाकुर्ली स्थानक गाठत धीम्या लोकलने प्रवास सुरू केला. मात्र, रेल्वेच्या अनागोंदीबाबत प्रवाशांनी संताप व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम सुरू केला. दुपारी १२.३०च्या दरम्यान बिघाड दुरुस्त केल्यनंतर एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने रवाना झाली. मात्र, यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक संध्याकाळी पर्यत विस्कळीत झाली होती.