भारताच्या ‘मोस्ट वॉन्टेड’ गुन्हेगारांच्या यादीत टायगर मेमनचा नंबर पहिल्या पाचात आहे. ९३चे साखळी बॉम्बस्फोट त्यानंच घडवले होते. त्यानंतर तो फरार झालाय. २२ वर्षांत त्याचा आवाजही कुणी ऐकलेला नाही. परंतु, याकूबच्या फाशीबाबत ऐकून टायगर घरच्यांशी संपर्क साधेल, हा पोलिसांचा अंदाज तंतोतंत खरा ठरला. ३० जुलैला, याकूबच्या फाशीच्या दीड तास आधी, मेमन कुटुंबीयांच्या माहीमच्या घरातील फोन खणखणला. तो टायगरचाच होता. आपली आई हनिफा आणि कुटुंबातील आणखी एका व्यक्तीशी टायगर साधारण तीन मिनिटं बोलला. हे सगळं संभाषण पोलिसांनी रेकॉर्ड केलंय. हा आवाज टायगरचाच असल्याचा दावा पोलीस अधिकाऱ्यांनी केला आहे.
मुंबईतील १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड मुश्ताक उर्फ टायगर मेमनचा आवाज मुंबई पोलिसांना तब्बल २२ वर्षांनी ऐकू आलाय. याकूब मेमन फासावर लटकण्याआधी, म्हणजेच ३० जुलैच्या पहाटे टायगरनं आपल्या घरच्या नंबरवर फोन केला होता. आईशी झालेल्या या संभाषणादरम्यान, आपण आपल्या भावाच्या फाशीचा बदला घेऊ, या फाशीची किंमत त्यांना चुकवावीच लागेल, अशी धमकी त्यानं दिली आहे. त्यामुळे तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्यात आणि टायगरनं हा फोन कुठून केला होता, याचा कसून शोध घेतला जातोय.
टायगरः सलाम- वालेकूम… जुल्म की इंतेहा हो गयी है. जाया नही जायेगा. सबके आंसू जाया नही जायेंगे. मै उनको चुकवाऊंगा…
आई (रडत): बस हो गया. पहले की वजह से मेरा याकूब गया, अब और नही देख सकती.
टायगर मेमनः तुम रो मत अम्मी. इसका इनको इजाफा देना होगा.
तसेच टायगर आणि मेमन कुटुंबियांचे हे संभाषण उघड झाल्याने टायगर हा कुटुंबाच्या कायम संपर्कात असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या वृत्ताला पोलिसांनी अद्याप कोणताही दुजोरा दिलेला नाही. मात्र ‘इकॉनॉमिक्स टाईम्स’ या दैनिकात याबाबत वृत्त प्रकाशित झाले आहे. त्या अनुषंगाने टायगरने केलेल्या कॉलचा तपास मुंबई पोलीस करीत आहेत. टायगरच्या या धमकीमुळे पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना सतर्क रहाण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या दक्षता पथकाने सदर संभाषण रेकॉर्ड केल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते. हा आवाज टायगर मेमनचाच असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

