राखी गालपांडे हिने 13 वर्षीय चैतन्य गालपांडे या आपल्याच मुलाला बॅटने मारहाण करुन हत्या केल्याची घटना समोर आली आहे. राखी गालपांडेचा पतीशी वाद सुरु होता. तसंच या दोघांमध्ये घटस्फोटाची केसही सुरु आहे.
नवऱ्यासोबत झालेल्या भांडणाचा राग अनावर झाल्याने आईनेच आपल्या 13 वर्षीय मुलाला बॅटने मारहाण करुन हत्या केल्याची खळबळजनक घटना पुण्यातील टिंगरेनगर भागात घडली आहे.
राखी गालपांडे एका खाजगी कंपनीत एचआर एक्झुकेटिव्ह म्हणून काम करते तर तिचा पती नागपूरमध्ये राहतात.
राखी आणि तिच्या पतीमध्ये वारंवार खटके उडत. मात्र, मुलगा कोणाकडे राहणार यावरुन झालेला वाद फारच टोकाला गेला. यातच मुलगा चैतन्यनेही आपल्या वडिलांकडे राहण्याचा हट्ट धरला. त्यामुळे नवऱ्यासोबतच्या भांडणाचा राग तिने मुलावर काढत त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समजते आहे.
या प्रकरणी राखी गालपांडे यांच्यावर विश्रांतवाडी पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी राखी गालपांडेला अटक केली आहे.

