‘सिंगल पॅरेटस्’च्या मुलांना या शाळेत प्रवेश नाही

शाळेत शिकणाऱ्या ज्या विद्यार्थ्याचे आई आणि वडील एकत्र राहत नसतील अशा विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळणार नाही, असा अजब फतवा नवी मुंबईच्या वाशी इथल्या ‘सेंट लॉरेन्स’ शाळेनं काढलाय. बरं शाळा प्रशासनानं एवढ्यावरच न थांबता जर शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा आई किंवा वडील दोघांपैकी कोणी एक जण स्वतंत्रपणे संभाळ करत असतील तर अशा ‘सिंगल पॅरेटस्’च्या मुलांना शाळेत प्रवेश न देण्याचा निर्णय सेंट लॉरेन्स या शाळेनं घेतलाय.

असाच अनुभव एका महिला पालकाला आला. या महिलेच्या पाल्याला शाळेत प्रवेश देण्यास शाळेतून नकार देण्यात आला. याचा जाब विचारताना या महिला पालकानं मुख्याध्यापकांची कारणंही कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलीत. ‘सिंगल पॅरेन्टस’ आपल्या पाल्याची जबाबदारी घेण्यासाठी सक्षम असतील तरी त्यांच्या पाल्यांना शाळेत प्रवेश का नाकारण्यात येतोय? याचा जाब त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना विचारला.

त्यावर मुख्याध्यापकांनी ‘आम्हाला शाळेत खूप समस्या येतात… हॅन्डल होत नाहीत…’ अशी उत्तरं दिली. पण, शाळेत प्रवेश दिल्यानंतर पालक विभक्त झाले तर काय? असा प्रश्न पालकानं मुख्याध्यापकांना विचारल्यानंतर त्यांचं उत्तर होतं ‘ऍडमिशन झाल्यानंतर पालक विभक्त झाले तर त्याला आम्ही जबाबदार नाही… पण ऍडमिशनच्या वेळी मात्र याच निकषावर आम्ही विद्यार्थ्यांना प्रवेश देणार… हा मी घेतलेला निर्णय आहे. सिंगल पॅरेन्टसच्या मुळांनी दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यावा… आमच्या शाळेत नाही” अशा शब्दांत मुख्याध्यापिकांनी संबंधित पालकांचा आक्षेप उडवून लावला.

 मुख्याध्यापीका शाळेचा कारभार जर अशा मनमानी पद्धतीनं चालवत असतील तर विभक्त राहणाऱ्या पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवायचं का नाही? किंवा एखाद्या पालकाचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या पत्नी अथवा पत्नीनं आपल्याला पाल्याला शिकवायचं नाही का? असा सवाल आता पालकांनी उपस्थित केलाय. अशा बेलगाम शाळांवर आता काय कारवाई होणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *