पाणबुडी अपघात झाल्यास बचाव शक्य

पाणबुडीचा पाण्याखाली अपघात झाल्यास नाविकांना वाचवणे कठीण बाब असते. आता मात्र अशा अपघातातही नाविकांचा पाण्याखालून बचाव करणे शक्य होणार आहे. यासंबंधीच्या एका विशेष वाहनाची नौदलाने बुधवारी यशस्वी चाचणी घेतली.

‘डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेईकल’ (डीएसआरव्ही) असे नाव असलेले पहिले वाहन गेल्यावर्षी नौदलाच्या ताफ्यात आले. मुंबईत मुख्यालय असलेल्या पश्चिम नौदल कमांडअंतर्गत मुंबईतच हे विशेष वाहन नौदलाच्या सुपूर्द करण्यात आले होते.

विशाखापट्टणम येथील पूर्व कमांडअंतर्गत बंगालच्या उपसागरात ही चाचणी झाली. यामध्ये ‘आयएनएस सिंधुध्वज’ या पाणबुडीला अपघात झाल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे अन्य नौकेद्वारे ‘डीएसआरव्ही’ पाण्यात सोडण्यात आले. रिमोट कंट्रोलच्या आधारे हे वाहन पाणबुडीपर्यंत पोहोचले. त्यानंतर अपघातग्रस्त पाणबुडीतील नाविक या वाहनाद्वारे सुरक्षितरीत्या पाण्याच्या वर आले, अशी माहिती नौदलातील प्रवक्त्याने दिली.

भारतीय नौदल दहापैकी एक

‘डीएसआरव्ही’ हे ६०० मीटर खोलीपर्यंत जाऊ शकते. त्यामध्ये एकवेळी २४ जण बसू शकतात. ‘डीएसआरव्ही’चा उपयोग करणारे भारतीय नौदल हे जगातील दहापैकी एक आहे. बुधवारची यशस्वी चाचणी नौदलाच्या शिरपेचातील मानाचा तुरा मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *