चंद्रपूरमध्ये पारा ४८ अंशांवर

चंद्रपूरमध्ये बुधवारी तापमानाच्या पाऱ्याने ४८ अंशाचा आकडा गाठला. हे तापमान यावर्षीचे देशातील सर्वोच्च तापमान असून बुधवारचे जगातील चौथ्या क्रमांकाचे तापमान आहे. तापमान यादीत जगात पाचव्या स्थानी असलेल्या ब्रह्मपुरीत बुधवारी ४७.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली.  जागतिक तापमानाचा विचार केला, तर दक्षिण आफ्रिकेतील केप सेंट फ्रान्सिसमध्ये जगातील सर्वोच्च म्हणजे ५६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यात पूर्वमोसमी पावसाने पाठ फिरविली असतानाच कोरडय़ा हवामानामुळे उष्म्याचा कहर कायम आहे. सर्वच ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ातील उष्णतेची लाट काही दिवस कायम राहणार असून, इतर ठिकाणीही तापमान चढे राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वरमध्येही सध्या तापमान सरासरीपेक्षा ५.३ अंशांनी अधिक होऊन ते ३३.८ अंशांवर गेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *