विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके

महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी नव्या पुस्तकांचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने समग्र शिक्षा अभियानांतर्गत बालभारतीकडे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सहा लाख ३९ हजार ५९४ पुस्तकांची मागणी केली आहे. यंदा १७ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. शालेय साहित्य खरेदी करण्याची लगबग महापालिका शिक्षण विभागाने सुरू केली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके मिळावीत यासाठी शिक्षण विभागाने बालभारतीकडे पुस्तकखरेदीची मागणी नोंदवली आहे.

शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांकडे पाठ्यपुस्तके असतील, अशी खात्री शिक्षण विभागाकडून देण्यात आली. शिक्षण विभागाच्या मागणीनुसार बालभारतीकडून महापालिकेच्या पिंपरी आणि आकुर्डीच्या उन्नत केंद्रावर पुस्तके दाखल झाल्यानंतर ५ जूनपासून २० केंद्रावरून पुस्तकांचे वितरण करण्यात येईल. नियोजनानुसार पुस्तक वितरण पार पडल्यास शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात नवी कोरी पुस्तके पडणार आहेत.

.
– समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तक वितरण

– महापालिका, अनुदानित, विनाअनुदानित व खासगी शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी लागू.

– बालभारतीकडे नोंदवलेली मागणी : ६,३९,५९४

– एकूण विद्यार्थी संख्या : १,१४,७९०

(१ ली ते ८ वी)

मराठी माध्यम : १,०१,६९९

हिंदी माध्यम : ३,५१८

इंग्रजी माध्यम : ५,५२९

उर्दू माध्यम : ४,०४४

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळण्याचा आनंद वेगळाच असतो. याच विचाराने यंदा विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी बालभारतीकडे पुस्तकांची मागणी नोंदविण्यात आली असून, पुस्तक वितरणाचे नियोजनही करण्यात आले आहे.

– ज्योत्स्ना शिंदे, प्रशासन अधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *