पेण तालुक्यातील हेटवणे धरणाचे पाणी नवी मुंबईला पुरवले जाते. मात्र या धरणाला लागून असलेली खरबाची वाडी या आदिवासी वस्तीतील नागरिक मात्र हंडाभर पाण्यासाठी हालअपेष्टा सहन करीत आहेत. यामुळे पाण्याबरोबरच रोजगाराचीही मोठी समस्या इथे निर्माण झाली आहे.
पेण तालुक्याच्या पूर्व विभागातील खरबाची वाडी. १०० उंबऱ्यांच्या या आदिवासीवाडीची लोकसंख्या ७०० च्या आसपास आहे . एप्रिल महिना सुरू झाला की गावातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू होते. गावातील दोनपकी एक विहीर कोरडीठाक पडलेली. खालच्या बाजूला असलेल्या विहिरीनेही तळ गाठला आहे . त्यातील झऱ्याचे पाणी साठवून गावकरी ते पिण्यासाठी वापरतात. हंडाभर पाण्यासाठी महिलांना संपूर्ण दिवस खर्ची घालावा लागतो. कधी काढण्याने तर कधी विहिरीत उतरून पाणी भरावे लागते. हे कमी म्हणून की काय, भरलेले हंडे घेऊन उंच डोंगर चढून गाव गाठताना जीव अक्षरश: गळयापाशी येतो.
काही दिवसांपूर्वी इथे टँकर यायचा पण निवडणुका संपल्यापासून टँकरने तोंडच दाखवले नाही असं ग्रामस्थ सांगतात. नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे हेटवणे धरण गावातून दिसते. परंतु दोन किलोमीटरवर असलेल्या या धरणाचे पाणी खरबाची वाडीला मिळत नाही. स्थानिक आमदार धर्यशील पाटील यांच्या वाक्रूळ गावातीलच ही वस्ती असून देखील येथील गावकऱ्यांना हंडाभर पाण्यासाठी पोरंबाळ घेऊन रात्र रात्र जागून काढावी लागते. ५ ते ६ तासांच्या प्रतीक्षेनंतर एक हंडा पाणी मिळते. त्यातच पाण्यावरून रोजची भांडणे ठरलेली. त्यातून गावातील सामाजिक वातावरण दूषित होते .कामधंदे सोडून पाण्याच्या मागे फिरावं लागत आहे . त्यामुळे रोजीरोटीची गंभीर समस्या इथं निर्माण झाली आहे . पाणी भरण्यातच संपूर्ण दिवस निघून जातो मग नोकरी धंद्यासाठी कुठेही जाता येत नाही, रोजगार बुडतो.
गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या कधी सुटलीच नाही . पाण्यासाठी दुसरा कुठलाही स्रोत नाही . त्यामुळे एकमेव विहिरीतून मिळणाऱ्या जेमतेम पाण्यातून पिण्यापासूनची सर्व कामे उरकावी लागत आहेत. कपडे धुणे, भांडी घासणे, अंघोळ करणे या सर्व कामासाठी विहीर हा एकमेव स्रोत आहे.
धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था खरबाची वाडीतील ग्रामस्थांची झाली आहे . आम्हाला कुणी वाली आहे की नाही असा सवाल इथले ग्रामस्थ विचारताहेत.
‘निवडणुका आल्या की पुढारी गावात येतात. नळपाणी योजना राबवण्याचे आश्वासन दिले जाते . निवडणुका संपल्या की परिस्थिती जैसे थे. नळपाणी योजना कधी गावात आलीच नाही. ही स्थिती वर्षांनुवष्रे तशीच आहे. याला आम्ही आता वैतागलो आहोत . आता यापुढे पाणी मिळाले नाही तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल .’ – नितीन वाघ, ग्रामस्थ युवक
‘हंडाभर पाण्यासाठी आम्हाला दिवस खर्ची घालावा लागतो. त्यात भरलेला हंडा घरी आणेपर्यंत जीव कासावीस होतो. हेटवणे धरणाचे पाणी समोर दिसते पण ते आम्हाला मिळत नाही हे पाहून डोळयात आसवं येतात . मार्च महिन्यापासून पाऊस पडेपर्यंत आम्हाला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते . शासकीय यंत्रणेने आमची ही समस्या गांभीर्याने घ्यावी .’ – लक्ष्मी वाघ, ग्रामस्थ महिला.
