कर्नल अरविंद जोगळेकर (निवृत्त) यांचे सोमवारी राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
जोगळेकर १९६२मध्ये लष्कराच्या कोअर ऑफ सिग्नल्समध्ये रूजू झाले. १९६५ व १९७१च्या युद्धात, श्रीलंकेतील ऑपरेशन पवन, मालदीवमधील कारवाईतही ते सक्रिय होते. त्यांना लष्करप्रमुखांचे प्रशस्तिपत्रही मिळाले होते. जम्मू-काश्मीर, पूर्वोत्तर राज्यांसह त्यांनी विविध भागात सेवा बजावली होती.
व्याख्यान आणि पुस्तकांच्या माध्यमातून कर्नल जोगळेकर यांनी पुण्यातल्या साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला होता. आपल्या कारकीर्दीत नेतृत्व केलेल्या लष्करी तळांवर, तिथल्या स्थानिक नागरिकांवर, भौगोलिक-सामाजिक-सांस्कृतिक परिस्थितीवर त्यांनी अनेक लेख लिहिले. त्यांचे एकत्रित संकलन करून पुस्तकेही प्रकाशित केली. ‘मी एक सैनिक’, ‘चारधाम यात्रा’, ‘मेरे वतन के लोगो’, ‘हाक हिमालयाची-साद संस्कृतीची’ या त्यांच्या काही पुस्तकांना पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. काही चित्रपटांमधील भूमिकांबरोबर त्यांनी काही जाहिरातींमध्येही काम केले होते.
