‘काही पुस्तके आणि देशातील ६४ कोटी युवक हीच माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची संपत्ती होती. याशिवाय इतर काहीही स्थावर व जंगम मालमत्ता त्यांच्या नावावर नाही,’ असे कलाम यांचे वैज्ञानिक सल्लागार व्ही. पोनराज यांनी म्हटले आहे. त्यामुळे ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून ओळख असलेले कलाम ‘उपभोगशून्य स्वामी’ असल्याचे सिद्ध झाले आहे.
पोनराज हे दोन दशकांपासून कलाम यांच्या जवळ होते. कलामांच्या संपत्तीबाबत पत्रकारांनी विचारले असताना पोनराज म्हणाले, ‘मध्यंतरी कलाम यांच्या नावावर बेंगळुरूमध्ये काही स्थावर मालमत्ता होती; मात्र ती त्यांनी विकून टाकली होती. त्याशिवाय त्यांच्या नावावर अन्य काहीही नाही. सध्या त्यांना विविध पुस्तकांच्या विक्रीतून येणारी रॉयल्टी आणि सरकारकडून पेन्शन मिळायची. या रकमेबाबत त्यांनी कुणी वारस नेमलेला आहे की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून याबाबत माहिती घेतली जाईल.’
काहींचे सन्माननीय अपवाद वगळता प्रत्येक क्षण पैशासाठी धडपड करणाऱ्या माणसांच्या सध्याच्या जगात कलामांची ही निरिच्छ वृत्ती नक्कीच आदर्श ठरावी.

