पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असून आज जम्मू जिल्ह्यातील पर्गवाल सेक्टरमध्ये करण्यात आलेल्या गोळीबारात एका नागरीकाचा मृत्यू झाला आहे तर एक जवान जखमी झाला आहे.
पाकिस्तानी सैन्याने पुन्हा कुरापत काढत जम्मू जिल्ह्यातील भारतीय चौक्यांना लक्ष्य केले. या गोळीबाराला सीमा सुरक्षा दलाच्या तुकड्यांनीही चोख प्रत्युत्तर दिलं. दोन्ही बाजूने अजुनही गोळीबार सुरू असल्याचे सांगण्यात आले. ‘कांचक आणि पर्गवाल सेक्टरमध्ये पहाटे ५ वाजून ४० मिनिटांनी सीमेपलिकडून गोळीबारास सुरूवात झाली. आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या आमच्या १२ चौक्यांवर पाक सैन्याने गोळीबार केला’, अशी अधिकृत माहिती बीएसएफच्या प्रवक्त्याने दिली.
दरम्यान, ऑगस्ट महिन्यात गेल्या चार दिवसात पाक सैन्याने हे आठव्यांदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. २ आणि ३ ऑगस्ट अशा दोन दिवसात पाक सैन्याने चार वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. कृष्णाघाटी, मंडी, बालकोट आणि पल्लानवाला या चार ठिकाणी गोळीबार करण्यात आला तर १ ऑगस्टलाही शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या दोन घटना घडल्या होत्या.

