हिंजवडी येथील एका प्रतिथयश कंपनीने सॉफ्टवेअर इंजिनीअर हा ‘एचआयव्ही’बाधित असल्याचे कळताच त्याला राजीनामा देण्यास सांगितले. मात्र, संबंधित कर्मचारी राजीनामा देत नसल्याचे लक्षात येताच तातडीने त्याला घरचा रस्ता दाखविला. त्यानंतर कंपनीत प्रवेशापासून ते त्याच्या कामाचे सगळे अधिकार काढून घेतल्याने संबंधित कर्मचारी दोन महिने कामावर आला नाही. कंपनीने कर्मचाऱ्याला पगारही दिला आणि त्यानंतर कंपनीने थेट निलंबन केल्याचे पत्र घरी पाठवून नोकरीवर घेण्यास नकार दिला.
या संदर्भात संबंधित सॉफ्टवेअर इंजिनीअरने हिंजवडी पोलिसांकडे तक्रार केली असून, त्याची दखल घेण्यात आली नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. संबंधित कर्मचाऱ्याने याबाबत माहिती दिली. सॉफ्टवेअर इंजिनीअर मूळचा पंजाब येथील रहिवासी आहे. तो त्याच्या पालकांसमवेत पंजाबला राहत होता. तिकडे खासगी कंपनीत काम करीत होता. २०१५नंतर त्याला सारखा अशक्तपणा, थकवा येत होता, तसेच तो वारंवार आजारी पडत होता. त्या दरम्यान, वडिलांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांचे रुग्णालयात उपचार सुरू होते. ‘माझी खराब झालेली प्रकृती पाहून तेथील डॉक्टरांनी मला काही चाचण्या करायला सांगितल्या. त्या चाचण्या केल्यानंतर मला ‘एचआय़व्ही’ असल्याचे निदान झाले होते. त्यानंतर मी उपचार सुरू केले. २०१६मध्ये मी पंजाब सोडून पुण्यात हिंजवडी येथील या कंपनीत नोकरीसाठी आलो. नोव्हेंबर २०१७पासून ते आतापर्यंत मी कंपनीत नोकरीत करीत होतो,’ असे त्या इंजिनीअरने सांगितले.
‘हिंजवडीच्या कंपनीत मी टीम लिडर होतो. २०१६पासून औषधोपचार सुरू होते. गेल्या वर्षी जुलैदरम्यान मी दोन तीन वेळा आजारी पडलो. सुट्टी घ्यावी लागली. त्या वेळी मला सुट्टी न घेण्याबाबत कंपनीच्या वरिष्ठांकडून सूचना करण्यात आली. मला कंपनीच्या वरिष्ठांकडून वारंवार त्रास दिला जात होता. अखेर त्यांना मला ‘एचआयव्ही’ असल्याचे सांगावे लागले. औंध येथील सरकारी रुग्णालयात माझ्यावर ‘एचआयव्ही’चे उपचार सुरु आहेत. पिल्ले यांनी माझ्या वरिष्ठ ‘एचआर’ला याबाबत माहिती दिली. त्यानंतर माझ्या आजाराचे सांगितल्यानंतर काही ना काही कारण सांगून राजीनामा देण्यास प्रवृत्त केले जात होते,’ असे त्या सॉफ्टवेअर इंजिनीअरने सांगितले.
कंपनीकडून ५ जुलैमध्ये २०१८मध्ये त्या सॉफ्टवेअर इंजिनीअरला बोलावण्यात आले. दुपारी तीन वाजेपर्यंत शिफ्ट होती. एचआर, ऑपरेशन मॅनेजर असे तिघे जण बैठकीत होते. ‘तुझे काम चांगले नाही. त्यामुळे आता तू राजीनामा दे. तुझा हा शेवटचा दिवस आहे, असे समजून घे,’ असे वरिष्ठांनी त्याला सांगितले. ‘माझ्या कामाबाबत शंका होती, तर त्याची विचारणा करण्यात आली नाही. माझ्यापूर्वी माझ्या टीममधील इतरांचे राजीनामे मागायला हवे होते. मला माझ्या टीमशी भेटू दिले नाही. नोकरी सोडण्याच्या पूर्वी १५ मिनिटांपूर्वी सांगितले, की हा आज तुझा शेवटचा दिवस आहे. मी राजीनामा द्यायला तयार होतो. फक्त केवळ कंपनीच्या लेटरवर मला कारण द्या, असे मी म्हटले पण मला ते लिहून दिले नाही,’ असे इंजिनीअरने सांगितले.
अखेर त्या इंजिनीअरने राजीनामा दिला नाही. त्याच्या दुसऱ्या दिवशी कंपनीत येण्याचा प्रवेश आणि इतर अधिकार रद्द करण्यात आल्याचे संदेश त्याला वरिष्ठांकडून पाठविले गेले. त्यामुळे त्याला कंपनीत जाणे अवघड झाले. दोन महिने घरी बसल्यानंतरही कंपनीकडून पगार दिला जात होता हे विशेष. अखेर ५ सप्टेंबरला पुन्हा त्यांची बैठक झाली. त्या वेळी त्याला कारणे दाखवा नोटिस देण्यात आली. त्यामध्ये मार्च महिन्यात पासवर्ड शेअर केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. परंतु, ते योग्य नसल्याचे इंजिनीअरचे म्हणणे आहे.
तक्रारीनंतर कंपनीला नोटीस
शेवटी माझा आजार कळताच त्यांनी मला काढण्याचा डाव सुरू केल्याचा आरोपही त्याने कंपनीच्या वरिष्ठांवर केला आहे. हिंजवडी पोलिसांकडे तक्रार केली. त्याशिवाय कामगार आय़ुक्तांकडे ही तक्रार केल्यानंतर कंपनीला नोटीस देऊन विचारणा करण्यात आली. ती प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. त्याबाबत कर्मचाऱ्याने आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला आहे.