मंत्रालयात ओळख असल्याचे सांगून अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नोकरीचे आमिष दाखवत तिघांना २४ लाखांना फसविल्याची घटना उघडकीस आली.
विशेष म्हणजे आपली मंत्रालयात ओळख असल्याचे सांगितल्यामुळे एसटीतील चालकाने कर्ज काढून मुलीच्या नोकरीसाठी पसे दिले. या चालकासह त्याच्या अन्य दोन नातेवाइकांची देखील याप्रकरणात फसवणूक झाली आहे. याप्रकरणातील जितेंद्र भोसले (रा. खारघर, मुंबई) याला अशाच प्रकरणात कोल्हापूर पोलिसांनी यापूर्वी अटक केलेली आहे. एसटीतील चालक महादेव श्रीकृष्ण पवार (रा. बाबा पेट्रोल पंप परिसर) यांनी यासंदर्भात तक्रार दिली. त्यांनी मुलीसह पाहुण्यातील नितीन तुराबसिंग सोळुंके व नीलेश लक्ष्मण सोनवणे यांच्यासाठी कनिष्ठ लिपिक पदाच्या नोकरीसाठी शिफारस केली होती. मन्नालाल प्रेमचंद बन्सवाल, जितेंद्र भोसले व पंडित कौडेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पवार यांनी कर्ज काढून टप्प्या-टप्प्याने तिघांना २३ लाख ९५ हजार रुपये दिल्याचे तक्रारीत म्हटले. तसेच, रक्कम घेतल्यानंतर आरोपींनी नोकरीची बनावट ऑर्डर करून मुलीसह पाहुण्यातील दोन तरुणांच्या हातात ठेवली. ते तिघे ऑर्डर घेऊन अकोल्याला गेले. मात्र तेथे ऑर्डर बनावट असल्याचे लक्षात आले. अखेर पवार यांनी १३ एप्रिल रोजी क्रांतीचौक पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली.