वसईत पुन्हा एकदा चड्डी बनियान गँगने धुमाकूळ घातला आहे. या गँगनं वसई पूर्व इथल्या सेक्टर 8 मधील तीन उच्चभ्रू इमारतींमध्ये वॉचमनचे हात पाय बांधून 3 घरात दरोडा टाकला. तोंडाला मास्क बांधून आलेल्या या चड्डी बनियान गँगचे 9 दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.
धक्कादायक म्हणजे, या गँगने वॉचमनचे हातपाय बांधून त्याला उलटा लटकवलं.
शनिवारी मध्यरात्री या गँगने ट्रीनिटी गार्डन, व्हिजन हाईटस, इंदपूरम या तीन इमारतीमध्ये वॉचमनचे हात पाय बांधून दरोडा टाकला. दोन घरांमध्ये काहीच हाती लागलं नाही. मात्र एका घरातील सत्तर हजार किमतीच्या सोन्या चांदीच्या दागिन्यावर दरोडेखोरांनी हातसाफ केला.
चड्डी बनियान गँगची हातात शस्त्र घेऊन घरात शिरतानाची दृश्यं सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. वसंत नगरीतील ट्रीनिटी गार्डन आणि व्हिजन हाईटस या दोन इमारतीमध्ये दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. ही वस्ती पूर्णपणे उच्चभ्रू आहे. याठिकाणी चार विंग आहेत. चारही बाजूने वॉचनमचा खडा पहारा असतो.
मात्र चड्डी बनियन घालून आलेल्या दरोडेखोरांनी वॉचमननाच बांधून ठेवून दरोडा टाकल्याने परिसरात दहशत आहे.
शनिवारी दरोडा टाकल्यानंतर रविवारी मध्यरात्री पुन्हा या गँगनं दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र रहिवाशांच्या सतर्कतेनं त्यांचा हा प्रयत्न फसला.
