मध्य रेल्वेवरील सायन आणि माटुंगादरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेनच्या महिला डब्याच्या दिशेने उपद्रवींनी दगड फेकला. यात दरवाजात उभी असलेली महिला जखमी झाली. कांचन शेलार असं जखमी महिलेचं नाव आहे.
कांचन शेलार या काल सकाळी पावणे दहाच्या सुमारास घाटकोपर रेल्वे स्थानकातून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढल्या. गर्दीमुळं त्या दरवाजातच उभ्या होत्या. इतर तीन महिला त्यांच्या बाजूलाच उभ्या होत्या. ट्रेननं सायन रेल्वे स्थानक सोडल्यानंतर अचानक महिला डब्याच्या दिशेनं दोन दगड आले. त्यातील एक दगड त्यांच्या डाव्या खांद्याला आणि एक दगड गुडघ्यावर लागला. यात त्या जखमी झाल्या. सहप्रवासी महिलांनी त्यांना मदत केली. त्यांना बसायला जागा दिली आणि पाणी दिलं. या प्रकरणी कांचन शेलार यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली नाही. ‘भिरकावलेला दगड माझ्या खांद्यावर आणि गुडघ्यावर लागला. अचानक घडलेल्या प्रकारानं आणि जोराचा फटका लागल्यानं मी जखमी झाले. रक्त वाहू लागलं. सहप्रवासी महिलांनी मला बसायला जागा दिली आणि पाणी दिलं. त्यामुळं मी सावरले. सुदैवानं दगड लागल्यानंतर मी ट्रेनमधून पडले नाही. दादर रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर तिथं प्रथमोपचार घेतले. ऑफिसला पोहोचल्यानंतर माझ्या गुडघ्याला आणि खांद्याला सूज आली होती, ‘ असं शेलार यांनी सांगितलं