…तरच कोळंबी आयात

समुद्रात कोळंबी पकडणाऱ्या मच्छिमारांच्या जाळ्यात समुद्री कासव येऊन त्यांना इजा होत असेल, तर अशा देशातून कोळंबी न घेण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. मात्र, असे होत असल्यास त्या मच्छिमारांनी ‘टर्टल एक्सक्लूडेड डिवाइस’ सर्व जाळ्यांना लावण्यात आल्यानंतर आणि तसे प्रमाणपत्र त्या देशाला दिल्यानंतर कोळंबी आयात करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वात जास्त मासेमारी महाराष्ट्रात अर्नाळा येथे होते. यासाठी अमेरिकेच्या तज्ज्ञांनी या सर्वेक्षणासाठी गुरुवारी अर्नाळा समुद्रकिनारी भेट दिली.

राज्यामध्ये कोळंबी मासेमारी, तसेच कोळंबी संवर्धन केले जाते. भारतामधून सर्वात जास्त कोळंबीची निर्यात अमेरिकेत होत असते. या निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा देखील वाटा आहे. महाराष्ट्रामध्ये ट्रॉलिंग व पद्धतीने कोळंबीची मासेमारी केली जाते. या पद्धतीने मासेमारी करतेवेळी या जाळ्यांमध्येसुद्धा अडकले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे असे झाल्यास त्याला पुन्हा समुद्रात सोडून देण्याचे काम हे वसईतील मच्छिमारांतर्फे केले जाते. मात्र, मासेमारी करताना समुद्री कासवांना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये, कासव संरक्षण करण्यासाठी अमेरिकेने एक मोठे पाऊल उचलले आहे.

‘द ब्युरो ऑफ ओशन अँड इंटरनॅशनल एनव्हायर्नमेंटल अँड साईंटीफिक अफेअर्स, डिपार्टमेंट ऑफ स्टेट, यूएसए’ यांनी १६ मे २०१८ च्या अधिसूचनेनुसार कोळंबी पकडणाऱ्या देशांनी मासेमारी करतेवेळी समुद्री कासवांना इजा होऊ नये यासाठी ‘टर्टल एक्सक्लूडेड डिवाइस’ (टीईडी) सर्व संबंधित जाळ्यांना लावण्यात यावे. यामुळे मासेमारी करताना समुद्री कासव जाळ्यात अडकले तरीही ते सहज जाळ्यातून बाहेर निघू शकतात. तसेच याबाबतचे प्रमाणपत्र दिल्याशिवाय अमेरिकेमध्ये कोळंबी निर्यात करण्यात येऊ नये, असे प्रतिबंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे याची खात्री करून घेण्यासाठी अमेरिकेचे काही प्रतिनिधी भारत दौऱ्यावर आले आहेत. केरळ, तमिळनाडू या ठिकाणी सर्वेक्षण केल्यानंतर महाराष्ट्रातील मुख्य ठिकाण म्हणून अर्नाळा समुद्र किनारी पाहणी करण्यासाठी गुरुवारी अमेरिकनतज्ज्ञांच्या पथकाने भेट दिली. अर्नाळा समुद्रकिनारी येऊन त्या ठिकाणी समुद्रात खोलवर मासेमारी करणाऱ्या बोटीना भेट दिली. प्रत्यक्ष मासेमारी कशी करण्यात येते याबाबत माहिती घेत अर्नाळा येथील माशांवरदेखील त्यांनी ताव मारला. याबाबत त्यांनी अहवाल सादर केला नसून, लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी अर्नाळा येथील प्रतिनिधींना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *