कांदे पोह्य़ात गुंगीचे औषध मिसळून एका १६ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना जरीपटका पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. आता पीडित मुलगी दोन महिन्यांची गर्भवती आहे. मनीष नीळकंठ गेडाम (४५) रा. जागृतनगर, चांदणी बारमागे, जरीपटका असे आरोपीचे नाव आहे.
१६ जानेवारीला सकाळी पीडितेचे आईवडील कामाला गेले असताना आरोपी तिच्या घरी आला. त्याने पीडितेला कांदे पोहे खायला दिले. ती बेशुद्ध होताच आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. शुद्धीवर आल्यानंतर तिला घडलेला प्रकार समजला. त्यानंतर त्याने १७ व १८ फेब्रुवारीला पुन्हा बलात्कार केला. कुणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. काही दिवसांनी पीडितेच्या पोटात दुखायला लागले. तिने आईला पोट दुखत असल्याचे सांगितले. आई तिला डॉक्टरकडे घेऊन गेली असता डॉक्टरांनी
मुलगी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. मुलीसह आईने पोलीस ठाणे गाठले व तक्रार दिली. पोलिसांनी बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.