पंढरपुरातल्या मूकबधिर शाळेत चार अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंढरपुरातील निर्भया पथकाने हा प्रकार उघडकीस आणला आहे . या प्रकरणातील चार शिक्षकांवर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती निर्भया पथकातील पोलीस उपनिरीक्षक गजानन गजभारे यांनी दिली आहे. तसेच या चौघांनाही अटक करण्यात आली आहे.
पंढरपूर शहर पोलीस ठाणे अंतर्गत निर्भया पथकाच्या कर्मचाऱ्यांनी साध्या वेशात निवासी मूकबधिर विद्यालय पंढरपूरला भेट दिली. या पथकातील महिला पोलीस शिपाई यांनी मूकबधिर विद्यालयातील काही मुलींची भेट घेतली. त्यांना काय काय अडचणी आहेत हे त्यांनी जाणून घेतले. तसेच मुलींना गुड टच, बॅड टच याबाबत माहिती दिली व त्यांना बॅड टचचे काही अनुभव आहेत का ?याबाबत विचारले असता त्यांना शिकवणारे शिक्षकच त्यांना बॅड टच करीत असल्याची तक्रार निर्भया पथकातील पोलिसांपुढे केली. मात्र, याबाबत शहानिशा करण्यासाठी सोलापूर येथील मूकबधिर विद्यालयात शिकविणाऱ्या एका विशेष शिक्षिकाना घेऊन पुन्हा त्या मूकबधिर विद्यालयात गेलो. त्यांच्या सोबत मदतीला महिला पोलीस उपनिरीक्षक मरे यांनाही बोलावून घेतले. तेथे असलेल्या मूकबधिर मुलींना त्यांच्या बाबतीत काय त्रास झाला होता याची माहिती त्या शिक्षिकेला दिली.
त्या महिला शिक्षिकेने मूकबधिर मुलींशी त्यांच्या भाषेत संवाद साधला. या वेळी पीडित मुलीना शिकवणारे शिक्षक ज्ञानोबा मल्हारी मस्के, अर्जुन तुकाराम सातपुते,संतोष बाळासाहेब कुलाल आणि सिद्धेश्वर शंकर वाघमोडे यांनी वेळोवेळी चार मुलींच्या शारीरिक विकलांगतेचा गैरफायदा घेऊन त्यांना नको असलेला टच करणे ,वाईट नजरेने पाहणे असे लैंगिक छळाचे प्रकार केल्याने त्यांच्या प्रश्नोत्तराच्या जबाबामध्ये स्पष्ट झाले. त्यानंतर सदर प्रकाराबाबत पिडीत मुलींच्या वतीने निर्भय पथकातील महिला पोलीस शिपाई मनेर यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणारे चारही शिक्षकाविरुद्ध पोस्को अॅक्ट व ३५४ (अ), ३५४ (ब), पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करून व तात्काळ अटक करून न्यायालयात हजर केले. त्या चार शिक्षकांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणी पुढील तपास पीएसआय गजानन गजभारे हे करीत आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारीपंढरपूर चे डॉक्टर सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली,निर्भया पथकाचे पी.एस.आय. गजभारे ,पोलीस, कॉन्स्टेबल भोसले,शिंदे महिला पोलीस कॉन्स्टेबल मणेर,मुडे, ताकमोगे यांनी हा अत्याचाराचा प्रकार उघडकीस आणला आहे.
