एसजीएस मॉलमध्ये खरेदीसाठी गेलेल्या तरुणीच्या पायावर मॉलमधील बॅगच्या ट्रॉलीवर ठेवलेली काचेची शीट पडून ती गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात मॉलच्या सहायक व्यवस्थापकासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरुणीचे वडील अभय त्रिपाठी (वय ५६, रा. लष्कर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभय त्रिपाठी वन विभागात पदावर कार्यरत आहेत. दरम्यान, चार दिवसांपूर्वी ते पत्नी व मुलीसोबत खरेदीसाठी एसजीएस मॉलमध्ये गेले होते. मॉलमधील एका ब्रँडेड कपड्याच्या दुकानामध्ये एका बाजूला बॅगच्या ट्रॉलीवर काचेची शीट ठेवली होती. तक्रारदार यांच्या मुलीने तेथील बॅग उचलताच ती शीट त्यांच्या पायावर पडली. यात गंभीर दुखापत होऊन तिचा पाय फॅक्चर झाला. हा प्रकार झाल्यानंतर त्यांनी उपचार घेऊन पोलिसांत तक्रार नोंदवली. निष्काळजीपणे काचेची शीट ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस तपास करत आहेत.
