आर्थिक टंचाईच्या झळा सोसत असलेल्या महानगर टेलिकॉम निगम लिमिटेडचे ( ‘एमटीएनएल’) नेटवर्क १ एप्रिलपासून कोलमडण्याची भीती आहे. कंपनीला टॉवरची सेवा पुरविणाऱ्या खासगी कंपनीने आपली १६ कोटी ६४ लाख रुपयांची थकबाकी ३१ मार्चपर्यंत न भरल्यास सेवा बंद करण्याचा इशारा दिला आहे. याचा फटका शहरातील सुमारे साडेबारा लाख मोबाइल ग्राहकांना बसण्याची चिन्हे आहेत. यामुळे अवघ्या दोन दिवसांत ‘एमटीएनएल’ व्यवस्थापन नेमका काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निधीची कमतरता असल्याने एमटीएनएलला गेल्या काही वर्षांपासून उतरती कळा लागली आहे. परिणामी कर्मचाऱ्यांचे वेतन थकू लागले असून, कंत्राटदारांचेही पैसे सप्टेंबर महिन्यापासून थकले आहेत. मोबाइल फोनला नेटवर्क मिळावे या उद्देशाने शहरात विविध ठिकाणी एमटीएनएल कंपनीने टॉवर उभारले. पण त्यासाठी ठरलेले भाडे सोसायट्यांना वेळेवर दिले जात नसल्याने काही सोसायट्यांनी टॉवरच्या दुरुस्ती-देखभालीसाठी कर्मचाऱ्यांना आवारात प्रवेश देणे नाकारले आहे. त्यातच काही सोसायट्यांनी मोबाइल टॉवरची वीज कापणे सुरू केल्याने काही भागांत एमटीएनएलची सेवा बंद झाली आहे. परिणामी शहरात अनेक ‘ब्लँक स्पॉट’ म्हणजेच नेटवर्क गायब होणारी ठिकाणे तयार झाली आहेत. यातच आता कंपनीला विविध ठिकाणी ‘टॉवर’ उभारून ते भाडेतत्त्वावर देणाऱ्या मोबाइल टॉवर कंपनीचे तब्बल १६ कोटी ६४ लाख रु.चे भाडे थकले आहे. हे भाडे भरण्यासाठी संबंधित कंपनीने वारंवार पत्रव्यवहार केला. तसेच एमटीएनएलच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकाही झाल्या. दरवेळेस आश्वासनांव्यतिरिक्त काहीच हाती आले नाही. यामुळे अखेर कंपनीने कारवाईचा बडगा उगारत एमटीएनएलला ३१ मार्चपर्यंत भाड्याची रक्कम भरावी, अन्यथा सेवा थांबविली जाईल, असा इशारा दिला आहे. कंपनीने एमटीएनएलला १८ मार्च रोजी पत्र लिहून हा इशारा दिला आहे. त्याला ११ दिवस उलटून गेले तरी व्यवस्थापनाने पैसे भरलेले नाही. नुकतेच एमटीएनएलला केंद्र सरकारने आर्थिक साह्य दिले असून, कर्मचाऱ्यांचे जून महिन्यापर्यंतचे वेतन होईल, इतका निधी उपलब्ध करून दिला आहे.
कंपनीसोबतच कामगारही जात्यात
टॉवर कंपनीला भाडे देण्यासाठी आता अखेरचे दोन दिवस शिल्लक असून इतक्या कमी मुदतीत एमटीएनएल ही रक्कम भरू शकणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, ‘ही रक्कम भरली जाईल, असे आश्वासन एमटीएनएलच्या व्यवस्थापनाने दिले आहे. मात्र जर ही रक्कम वेळेत भरली गेली नाही तर एमटीएनएलची व्यवस्था पूर्णपणे कोलमडेल आणि कर्मचारीही देशोधडीला लागतील’, अशी भीती माहिती संचार युनियनचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी व्यक्त केली आहे.
