प्रेमविवाहित मुलीचे माहेरच्यांकडून अपहरण

प्रेमविवाहानंतर अमरावतीत वास्तव्याला आलेल्या तरुणीचे जालन्यातील माहेरच्या मंडळीने अपहरण केले. या घटनेची तक्रार मुलाच्या आईने गाडगेनगर पोलिसांत नोंदविली आहे. पोलिसांनी मुलीच्या माहेरकडील पुरुष व दोन महिलांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला आहे.
जालना येथील रहिवासी तरुणीचे अमरावतीच्या गाडगेनगर हद्दीतील रामपुरी कॅम्पस्थित उदासी गल्लीतील एका तरुणाशी प्रेमसूत जुळले. दोघांनी लग्न करून संसार थाटला.

ती तरुणी रामपुरी कॅम्प येथील सासरी राहू लागली. यादरम्यान मुलीच्या कुटुंबीयांनी जालना येथे पोलिसांत तक्रार नोंदविली. त्यावरून त्यांनी अमरावती गाठले. मात्र, लग्नाचे कायदेशीर दस्तऐवज दाखविल्यानंतर जालना पोलीस परतले.
दरम्यान, पोलिसांनी कारवाई केली नसल्याचे पाहून गुरुवारी दुपारी १२.२५ वाजताच्या सुमारास मुलीच्या माहेरकडील एक पुरुष व दोन महिला एमएच ४३ – ४४०३ क्रमांकाच्या कारने सासरी पोहोचले. घरात घुसून त्यांनी सासू व मुलीला मारहाण केली. त्यानंतर मुलीला कारमध्ये पळवून घेऊन गेले. सुनेला पळवून नेल्याची तक्रार महिलेने गाडगेनगर पोलिसांत नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी दिलीप सले व दोन महिलांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला. या घटनेचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद चव्हाण यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *