कुर्ला प्रकरणानंतर मध्य रेल्वेवरील मुंबई विभागातील सरबत विक्री वादाच्या भोवऱ्यात सापडली. त्यावर तोडगा म्हणून मध्य रेल्वेने खुल्या सरबत विक्रीवर बंदी घातली आहे. आरोग्याला घातक अशा पद्धतीने बनवण्यात येणारे केवळ लिंबू सरबतच नव्हे, तर काला खट्टा, ऑरेंज ज्यूस ही पेये देखील रेल्वे स्थानकांतील स्टॉलमधून हद्दपार होणार आहेत.
१३ मे २०१३ रोजी मुंबई विभागातील रेल्वे स्थानकांवर लिंबू सरबत विक्रीला परवानगी देण्यात आली. या परवानगीनुसार स्थानिक पेये आणि विविध सरबते स्थानकांतील स्टॉलवर विकण्याची मुभा रेल्वे प्रशासनाने दिली. मात्र आरोग्याला घातक अशा पद्धतीने हे सरबत परवानाधारकांकडून बनवण्यात येते. यात प्रवाशांच्या आरोग्याबाबत कोणतीच काळजी घेण्यात येत नाही, असे मध्य रेल्वेने काढलेल्या लेखी आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
कुर्ला रेल्वे स्थानकातील व्हायरल व्हिडीओमुळे मध्य रेल्वेच्या ढिसाळ कारभारावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. अखेर रेल्वेच्या सक्षम प्राधिकरणाने लिंबू सरबताची विक्री करण्याची परवानगी नाकारली आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईचा पारा चढा असल्याने प्रवाशांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. तहान भागवण्यासाठी केवळ पाणीच पुरेसे नसल्याने महागडे सीलबंद पेय घेण्यापेक्षा सामान्य प्रवाशांना ३ ते ५ रुपयांना उपलब्ध होणाऱ्या लिंबू सरबताचा मुख्य आधार होता. मात्र रेल्वेमधील कंत्राटदारांकडून स्वच्छतेला बाजूला सारून लिंबू सरबत बनवण्यात येत असल्याचे वास्तव समोर आले होते. यामुळे ऐन उन्हाळ्यात ४५ लाख लोकल प्रवाशांना सरबतबंदीला सामोरे जावे लागणार आहे.
पश्चिम रेल्वेवर तक्रार नाही
मध्य रेल्वेने स्थानकांतील स्टॉलवर सरबत विक्री करण्यास बंदी घातली असली तरी, पश्चिम रेल्वेच्या लोकल स्थानकांवर सरबत किंवा खाद्यपदार्थांबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याचे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे. मध्य रेल्वेने लिंबू सरबतासोबतच बाजारात उपलब्ध होणाऱ्या सिरपच्या मदतीने बनवण्यात येणाऱ्या कालाखट्टा, ऑरेंज सरबत यांची देखील विक्री करण्यास मनाई केली आहे. असे असले तरी गेल्या तीन वर्षांत पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात आरोग्याला घातक अशा पद्धतीने सरबत बनवण्याची कोणतीही घटना समोर आलेली नाही. तसेच निकृष्ट खाद्यपदार्थांबाबतही तक्रार दाखल झालेली नाही. मुंबई विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सर्व स्टॉलची नियमित पाहणी आणि तपासणी करण्यात येत असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.
