देशभरात रविवारी सर्व सरकारी बँका खुल्या राहणार; रिझर्व्ह बँकेची सूचना

येत्या रविवारी देशभरातील सर्व सरकारी बँका खुल्या राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना तशा सूचना दिल्या आहेत. खरंतर यंदाच्या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस (३१ मार्च) हा रविवारी येत असल्याने या दिवशी बँका खुल्या राहणार आहेत. त्यामुळे सरकारी व्यवहार करणाऱ्या बँकांच्या शाखांसाठी या सूचना रिझर्व्ह बँकेने दिल्या आहेत.

रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात एक परिपत्रकही जारी केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, आर्थिक देवाण-घेवाणीच्या व्यवहारांसाठी ३१ मार्च २०१९ रोजी सरकारी बँकांची सर्व पे अँड अकाऊंड कार्यालये खुली राहतील. त्यामुळे सर्व सरकारी बँकांना सूचना देण्यात येते की, त्यांनी आपल्या सर्व शाखा रविवारी (३१ मार्च) खुल्या ठेवाव्यात.

या परिपत्रकानुसार, सरकारी बँकांच्या सर्व शाखा ३० मार्च २०१९ रोजी रात्री ८ वाजेपर्यंत आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ३१ मार्च २०१९ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खुल्या राहणार आहेत. त्याचबरोबर ग्राहकांना आरटीजीएस आणि एनईएफटीसहित सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक व्यवहारही ३० आणि ३१ मार्च रोजी नियोजित वेळेनुसार करता येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *