मुलीवर अत्याचार, वडिलांना तुरुंगवास

सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या वडिलांना न्यायालयाने १० वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा ठोठावली आहे. २०१६ मधील हा प्रकार असून याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नवी मुंबईतील घणसोली परिसरात ४० वर्षीय आरोपी राहत असून पत्नी कामावर गेल्यानंतर आरोपीने स्वत:च्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलीने ही बाब काकीला सांगितल्यानंतर अत्याचाराचा प्रकार समोर आला होता. आरोपीला एक मुलगा असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यांनतर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. सरकारी वकील वर्षा चंदने यांनी एकूण सहा साक्षीदार तपासले. पीडित मुलीची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायाधीश एस. बी. भालकर यांनी आरोपीला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तसेच दहा हजारांचा दंडही ठोठावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *