आयकर विभागाने उत्तर महाराष्ट्रातील डॉक्टर आणि वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये मोठे घबाड हाती लागले आहे.
एकूण २० व्यक्तींच्या ४० मालमत्तांच्या ठिकाणी आयकराने तपासणीसत्र राबविले. एका कृषी प्रक्रिया उद्योगाचीही झडती घेण्यात आली. या सर्व कारवाईत तब्बल १८० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड झाली असून, १२ कोटींची रोख रक्कम व दागिने जप्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, रेफरल कट प्रॅक्टीसचा गोरखधंदा या छाप्यांद्वारे समोर आला आहे.
आयकर विभागाने नाशिक, जळगाव आणि धुळे या तीन शहरांमधील एकूण २० वैद्यकीय व्यावसायिकांच्या ४० मालमत्तांवर गेल्या आठवड्यात छापासत्र राबविले. मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद येथील एकूण २२५ आयकर अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या पथकांद्वारे हे छापे टाकण्यात आले. या छाप्यांमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठीच खळबळ उडाली आहे. नामांकित हॉस्पिटल्सवरील या छाप्यांमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. अतिशय गोपनीय पद्धतीने आणि पोलिस बंदोबस्तात जवळपास ३ ते ४ दिवस हे तपासणीसत्र सुरू होते. सर्व बँक खात्यांमधील व्यवहारांसह, रोख रक्कम, दागिने, मालमत्तांच्या नोंदी, कागदपत्रे या साऱ्यांचीच उलट तपासणी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुरू होती. नोटाबंदीनंतर आयकर विभागाकडून टाकण्यात आलेले उत्तर महाराष्ट्रातील हे सर्वांत मोठे छापे होते. त्यामुळे त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. या छाप्यांमध्ये एकूण ८० कोटींची बेहिशेबी मालमत्ता आयकर विभागाला आढळून आली आहे. या मालमत्तेत खासकरून जमिनींचा समावेश आहे. त्यामुळे या प्रकरणी आयकर विभागाकडून या व्यावसायिकांची यापुढील काळात आणखी चौकशी होण्याची चिन्हे आहेत. या छाप्यांमध्ये एकूण १२ कोटी रुपयांची रोख रक्कम आणि दागिने आयकर विभागाने जप्त केले आहेत. या दागिन्यांच्या पावत्याही आयकराने ताब्यात घेतल्या आहेत. दरम्यान, या छाप्यांमधील आकडे पाहता आयकर विभागाकडून याच क्षेत्रातील अन्य व्यावसायिकांवरही छापे टाकले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
त्यांच्याकडे सापडले १०० कोटी
नाशिक जिल्ह्यातील एका कृषी प्रक्रिया उद्योगाच्या कार्यालयाचीही झडती आयकर विभागाने याचदरम्यान घेतली. या झडतीमध्ये या उद्योगाकडे तब्बल १०० कोटींची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. त्यामुळे या प्रकाराची आयकर विभागाने गंभीर दखल घेतली असून नजीकच्या काळात या उद्योगावर मोठी कारवाई होण्याची चिन्हे आहेत.
कट प्रॅक्टिसचा गोरखधंदा
देशात प्रथमच वैद्यकीय व्यावसायिकांवर अशा प्रकारचे छापे टाकण्यात आले होते. रेफरल कट प्रॅक्टिसचा मुख्य संशय या छाप्यांमागे होता. तपासाअंती तो खरा असल्याचे स्पष्ट झाले आहे. एक डॉक्टर किंवा व्यावसायिक दुसऱ्या व्यावसायिक किंवा डॉक्टरचा संदर्भ रुग्णाला देऊन मोठ्या प्रमाणात कमिशन उकळत असल्याचा गंभीर प्रकार उघड झाल्याने वैद्यकीय क्षेत्र आता चर्चेत येण्याची चिन्हे आहेत. बेहिशेबी मालमत्तेमागे हीच कट प्रॅक्टिस असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. वैद्यकीय व्यवसायाला काळिमा फासणारा हा प्रकार असून, आयकर विभाग, तसेच राज्य आणि केंद्र सरकार याची काय दखल घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
