नगर तालुक्यातील वाकोडी येथे हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याच्या वादाच्या कारणातून चार जणांनी मिळून तलवारी, कटावणी, लाकडी दांडक्याने मारहाण करून एकाचा खून केला. तर एकाला गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनला खुनाचा गुन्हा नोंदविण्यात येऊन दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
विजय नारायण पवार (वय २५, वाकोडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. त्याचा भाऊ अविनाश नारायण पवार हा गंभीर जखमी झाला आहे. सोनू नारायण पवार याच्या फिर्यादीवरून गावातीलच लखन सुंदर कांबळे (वय २२), दिनेश नाथा सूर्यवंशी (वय ३६), कुंदन सुंदर कांबळे, जिगर सुंदर कांबळे यांच्याविरुद्ध खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे या कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. लखन कांबळे व दिनेश सूर्यवंशी या दोघांना अटक करण्यात आली आहे. २१ फेब्रुवारी रोजी गावातील बंटी पवार याचा हळदीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात नाचण्याच्या कारणातून विजय पवार व लखन कांबळे या दोघांमध्ये भांडण झाले. हे भांडण पोलिस स्टेशनपर्यंत गेले होते. त्यानंतर भांडणे आपसांत मिटली होती. परंतु, शुक्रवारी रात्री लखन कांबळे, दिनेश सूर्यवंशी व इतर दोघे हातात तलवार, कटावणी, लाकडी दांडके घेऊन विजय पवार व अविनाश पवार यांना मारहाण करीत गावातील समाजमंदिराजवळ घेऊन गेले. त्या ठिकाणी आरोपींनी दोघांना मारहाण केली. त्यानंतर जखमी दोघांच्या नातेवाईकांनी दोघांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले; परंतु, उपचारापूर्वीच विजय पवार याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. शनिवारी चार आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपास करून लखन कांबळे व दिनेश सूर्यवंशी या दोघांना पोलिसांनी अटक केली.
