वाईट स्वप्नं पडतात म्हणून नाशिकमध्ये एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. वाईट स्वप्नं पडतात म्हणूनच या महिलेने आत्महत्या केली की यामागे आणखी काही कारण आहे याचा तपास पोलीस करत आहेत. जयश्री भगत असे या महिलेचे नाव होते अशीही माहिती समजली आहे.
नाशिकच्या पाथर्डी भागात रहाणाऱ्या जयश्री भगतला गेल्या काही महिन्यांपासून भीतीदायक आणि वाईट स्वप्नं पडत होती. त्यामुळे जयश्री भगत खचल्या होत्या, त्यांच्यावर उपचारही सुरु होते. मात्र त्यांनी गुरुवारी रात्री त्यांनी स्वतःला घरात बंद करून घेतलं आणि अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. जयश्री भगत यांचं माहेर इगतपुरी यांचं सासर त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. पतीच्या नोकरी निमित्ताने ते नाशिक शहरात आले होते.
भीतीदायक स्वप्नं पडणं, भास होणं हे आणि अशा प्रकारचे मानसिक आजार अनेकांना असतात. सतत विचार करणं, चिंता करणं, दडपण घेणं अशी अनेक कारणं त्यामागे असू शकतात. अशा रुग्णांना विश्वासात घेऊन त्यांच्यावर इलाज करणे, मनातील भीती घालवणे असे उपाय करता येतात असं मानसोपचार तज्ज्ञांनी म्हटलं आहे. आता जयश्री भगत यांनी इतकं टोकाचं पाऊल वाईट स्वप्नांमुळेच उचललं की आणखी कशामुळे याचा शोध पोलीस घेत आहेत.
