नवीन कार्डसाठी पिन नंबर तयार करून देण्याच्या बहाण्याने एटीएम सेंटरमध्ये हेराफेरी करणाऱ्या टोळीचा गोवंडी पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी अजयकुमार राजभर आणि अब्दुल्ला शेख यांना नुकतीच अटक केली. त्यांनी खातेदाराला फसवून ६२ हजार रुपये परस्पर काढले असून अशाप्रकारे त्यांनी अनेकांना फसविल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
चालक असलेल्या अन्वर जियाउद्दीन शेखने नवीन एटीएम कार्ड घेतले. २७ जानेवारीला अन्वर हा गोवंडी पूर्वेकडील जैन मंदिराच्या बाजूला असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या एटीएम सेंटरमध्ये नवीन पिन नंबर तयार करण्यासाठी गेला. याचवेळी अजयकुमार आणि अब्दुल्ला एटीएम सेंटरजवळ घुटमळत होते. बराच वेळ अन्वर बाहेर येत नसल्याचे पाहून हे दोघे आतमध्ये गेले. कार्ड नवीन घेतल्यानंतर पिन नंबर स्वतः तयार करावा लागतो. यासाठी आम्ही तुला मदत करतो असे सांगून दोघांनी अन्वर याचे एटीएम कार्ड स्वतःकडे घेतले. या कार्डप्रमाणे हुबेहूब दिसणारे दुसरे कार्ड त्याला दिले. अन्वरकडून घेतलेल्या कार्डद्वारे पिन नंबर तयार करून या दोघांनी ६२ हजार रुपये काढले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अन्वरने गोवंडी पोलिस ठाण्यात तक्रार केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत माने यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांवरून अजयकुमार आणि अब्दुल्ला यांना शोधून काढले. त्यांचा आणखी किती गुन्ह्यांत सहभाग आहे याचा तपास पोलिस करत आहेत.
