शौर्य चक्र विजेता शहीद जवान औरंगजेबचे वडील मोहम्मद हनीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ३ फेब्रुवारी रोजी भाजपात प्रवेश केला आहे. जम्मू-कश्मीरधील पुलवामात रायफलमन औरंगजेब यांची १४ जून २०१८ रोजी दहशतवाद्यांनी अपहरण करून अत्यंत निर्दयीपणे हत्या केली होती.
मोहम्मद हनीफ यांच्यासोबत माजी लेफ्टिनेंट जनरल (सेवानिवृत्त) राकेश कुमार शर्मा यांनीही मोदींच्या उपस्थित भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मोदींनी भाजपामध्ये दोघांचेही स्वागत केले आहे. भाजपात प्रवेश करताना मोहम्मद हनीफ यांनी मोदींना शहीद मुलाचा फोटो मोदींना भेट दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी जम्मू काश्मिरच्या दौऱ्यावर होते. हेच औचित्य साधत राकेश कुमार शर्मा आणि मोहम्मद हनीफ यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
दहशतवाद्यांनी केली होती औरंगजेबची हत्या –
शहीद औरंगजेब यांचे वडील मोहम्मद हनीफ हेही माजी सैनिक आहेत. १४ जून २०१८ रोजी ईदच्या सुटीसाठी घरी जात असलेल्या औरंगजेब यांचे पुलवामा येथील कालम्पोरा येथून अपहरण करण्यात आले आणि त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ईदच्या दिवशी औरंगजेब यांच्या सलानी गावात शोककळा पसरली होती. त्यावेळी औरंगजेब यांच्या वडिलांनी सरकारला ७२ तासांचा वेळ दिला होता. मी सरकारला ७२ तास देतो. नाहीतर मी स्वत: जाऊन बदला घेईन, असे त्यांनी म्हटले होते.