डम्परच्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू

पूर्व द्रुतगती महामार्गावर शनिवारी विक्रोळीजवळ डम्परने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. अक्षय प्रमोद गुप्ता (३५) आणि आरती गुप्ता (३२) अशी मृतांची नावे असून या अपघातामध्ये त्यांची आठ वर्षाची मुलगी आश्चर्यकारकरित्या बचावली. अपघातानंतर पळालेल्या चालकाचा पोलिस शोध घेत आहेत.

ठाणे येथील कोलशेत रोड येथे राहणारे गुप्ता दाम्पत्य मुलगी राशी हिला सोबत घेऊन दुचाकीवरून वांद्रे कुर्ला येथे गेले होते. शनिवारी दुपारी घरी परतत असताना विक्रोळी येथील फिरोजशहा मेहता पुलाजवळ भरधाव डम्परने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यावेळी अक्षय गुप्ता दुचाकी घेऊन डम्परच्या उजव्या बाजूला होते. डम्परचालकाने अचानक उजव्या बाजूला वळण घेतल्याने दुचाकीला धडक बसली आणि अक्षय, आरती आणि राशी खाली पडले. हेल्मेट न घातल्याने अक्षय आणि राशी हे दोघे डम्परच्या मागच्या चाकाखाली आले. तर राशी काही अंतरावर फेकली गेली. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. घटनास्थळी उपस्थित असणाऱ्यांनी याबाबतची माहिती विक्रोळी पोलिसांना दिली. पोलिसांनी तिघांनाही राजावाडी रुग्णालयात नेले. परंतु दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी अक्षय आणि आरती यांना मृत घोषित केले तर किरकोळ जखमी झालेल्या राशीवर उपचार करण्यात आले. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या आधारे चालकाचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *