मोबाइलवर बोलत असताना गच्चीवरुन खाली पडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. अनिरुद्ध असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो हैदराबादमधील आयआयटीचा विद्यार्थी होता. सात मजली हॉस्टेलच्या गच्चीवर अनिरुद्ध मित्राशी बोलत असता ही दुर्घटना घडली. पोलिसांना सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचा संशय होता. मात्र नंतर ही दुर्घटना असल्याचं सिद्ध झालं.
अनिरुद्ध मेकॅनिकल अॅण्ड एरोस्पेस इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. पोलीस उप-निरीक्षक श्रीकांत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिरुद्ध रात्री 12 वाजून 45 मिनिटांनी मित्राचा मोबाइल फोन आला असता गच्चीवर गेला होता. यावेळी तेथून खाली पडून त्याचा मृत्यू झाला.
मित्रांकडे चौकशी केली असता अनिरुद्ध नेहमी टॅबवर पुस्तकं वाचण्यासाठी आणि मोबाइलवर बोलण्यासाठी गच्चीवर जात असे अशी माहिती दिली. अनिरुद्धच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला आहे. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात आला.