पती चारित्र्यावर संशय घेत असल्याने कंटाळलेल्या पत्नीने मटणात विष टाकून त्याची हत्या केल्याची घटना राहाता तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मीना बनसोडे या महिलेला अटक केली आहे.
राहाता तालुक्यातील साकुरी गावात सुनील बनसोडे (वय ४०) आणि त्याची पत्नी मीना हे दाम्पत्य राहत होते. सुनील हा पत्नी मीना हिच्या चारित्र्यावर नेहमीच संशय घेऊन तिला त्रास देत होता. या त्रासाला मीना कंटाळली होती. शेवटी तिने पतीच्या हत्येचा कट रचला. १७ जानेवारी रात्री दहाच्या सुमारास मीनाने जेवणात मटण केले. तिने मटणात विष टाकले. विष टाकल्यानंतर तिने बाटली घराबाहेर फेकून दिली. पहाटे सुनील याला त्रास सुरु झाला. १८ जानेवारी रोजी सकाळी साडेपाच वाजता सुनीलला उपचारासाठी शिर्डी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचारादरम्यान २२ जानेवारी रोजी दुपारी अडीचच्या सुमारास सुनीलचा मृत्यू झाला. शवविच्छेदनात विषप्रयोगामुळे सुनीलचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी संशयाच्या आधारे मीनाची चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी मीनाला अटक केली आहे.