मध्य रेल्वेवरील गर्दीचे स्थानक असलेल्या ठाण्यातील प्रवाशांना फेब्रुवारीपासून एका ‘पूल’बंदीला सामोरे जावे लागणार आहे. धोकादायक अवस्थेत असलेला कल्याण दिशेकडील जुन्या पादचारी पुलाची दुरुस्ती मध्य रेल्वे करणार असल्याने सन १९७२पासून सेवेत असलेला हा पूल २ फेब्रुवारीपासून ६९ दिवस बंद राहणार आहे. मात्र, ठाणे स्थानकात लोकल, एक्स्प्रेससह ट्रान्स हार्बरवरील प्रवाशांचीही गर्दी होत असल्याने त्यांची गैरसोय टाळण्यासाठी दुरुस्तीचे काम दोन टप्प्यांमध्ये करण्यात येईल. तोपर्यंत प्रवाशांनी स्थानकातील उर्वरित ४ पुलांचा वापरा करावा, अशी सूचना म. रेल्वेने केली आहे.
दुरुस्तीचा पहिला टप्पा २ फेब्रुवारी ते ११ एप्रिल (६९ दिवस) असा आहे. या काळात पुलावरून फलाट क्रमांक २ आणि ३ वरील प्रवेश बंद राहील.
दुसऱ्या टप्प्याचे काम ४९ दिवसांचे असून २२ फेब्रुवारीपासून ते सुरू होईल. या काळात पुलावरून फलाट क्रमांक ४, ५/६, ७/८, ९/१०वरील प्रवेश बंद राहील.
मिलन सबवेही रात्री बंद
सांताक्रूझ आणि विलेपार्ले स्थानकांदरम्यानचा मिलन सबवे दुरुस्तीनिमित्त ४ फेब्रुवारी ते ५ मार्च या काळात रात्री १२ ते पहाटे ५ वेळेत वाहनांसाठी बंद राहणार आहे. यामुळे दिवसा वाहतूककोंडीचा त्रास सहन करणाऱ्या सांताक्रूझ आणि विलेपार्ले येथील प्रवाशांना रात्रीच्या प्रवासातही पर्यायी मार्गावरील कोंडी सहन करावी लागणार आहे.