लोणावळ्यात गुजरातच्या पर्यटकांना जबर मारहाण; तीन जण गंभीर जखमी

लोणावळा येथे सोमवारी गुजरातमधून आलेल्या काही पर्यटकांना जबर मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. स्थानिक व्यावसायिकांनी पर्यटकांना मारहाण केल्याचे समजते. यामध्ये तीन पर्यटक गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. येथील टायगर पॉईंटच्या परिसरात हा प्रकार घडला. हे पर्यटक सूर्यास्त पाहण्यासाठी याठिकाणी आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबतची मुले घोड्यावर बसली होती. मात्र, टायगर पॉईंटजवळ आल्यानंतर घोड्याच्या मालकाने ठरलेल्या सौद्यापेक्षा जास्त पैसे मागितले. यावरून त्यांच्यात बाचाबाची सुरु झाली. हा प्रकार सुरु असताना याठिकाणी व्यवसाय करणारे अन्य काहीजणही भांडणात सामील झाले. या सगळ्यांनी मिळून पर्यटकांना बेदम मारहाण केली. यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे.

या घटनेनंतर जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पोलिसांनी याबाबत कारवाई केल्याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *