चारा आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

चंद्रपूरमधील जंगलात चारा आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. राजू नागेश्वर गुजलवार (३५) असे या तरुणाचे नाव असून बुधवारी दुपारी ही घटना घडली.

लोहारा गावात राहणारा राजू हा बुधवारी सकाळी चारा आणण्यासाठी जंगलात गेला होता.  लोहारा- मामला या दोन गावांच्या सीमेवरील जंगलात तो चारा गोळा करत होता. यादरम्यान त्याच्यावर वाघाने हल्ला केला. या  हल्ल्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दुपारच्या सुमारास वन विभागाला राजूचा मृतदेह मिळाला. शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या वर्षभरात २५ पेक्षा जास्त लोकांचा वाघाच्या हल्ल्यांत मृत्यू झाल्याची माहिती नुकतीच लोकसभेत देण्यात आली होती. केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री महेश शर्मा यांनी ही माहिती लोकसभेत दिली होती. ३१ डिसेंबर २०१८पर्यंत विविध राज्यांत झालेल्या व्याघ्रहल्ल्यांमध्ये २७ जणांचा मृत्यू झाला. यात महाराष्ट्रात व्याघ्रहल्ल्यांमुळे १५ जणांना तर उत्तर प्रदेशात चार जणांना आपले प्राण गमवावे लागल्याचे म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *