किमान वेतन व सामाजिक सुरक्षा या मुद्यांवरुन खासगीकरण व कंत्राटीकरणाला विरोध करण्यासाठी देशभरातील कामगारांनी अखिल भारतीय संप ८ व ९ जानेवारी रोजी पुकारला असून, त्यात बँकाही यात सहभाग घेणार आहेत. त्यामुळे या दोन दिवशी देशभरातील बँका बंद राहणार असून, त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होणार आहे. गेल्या काही दिवसापासून बँकाचे विलीनीकरण व इतर प्रश्नांमुळे बँकेचे कर्मचारी प्रचंड नाराज आहे. त्यांनी नुकताच संप केला. त्यावेळी देशभरातील १० लाखाहून अधिक कर्मचारी यात सहभागी झाले होते. आता पुन्हा या संपात बँका उतरणार आहे. या संपाबाबत ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनने पत्रक प्रसिध्द करुन या संपामागची भूमिका स्पष्ट केली आहे. बँकिंग उद्योगाचे खासगीकरण करण्याचे सरकारचे सुरू असलेले प्रयत्न, सहयोगी बँकांचे स्टेट बँकेतील विलीनीकरण आणी आता विजया-देना आणि बँक ऑफ बडोदा या बँकांचे एकत्रिकरणाच्या माध्यमातून सरकार एकत्रिकरणाचे धोरण पुढे रेटत आहे. त्याचप्रमाणे सरकारचे आर्थिक निर्णय, जीएसटी, एफआरडीआय विधेयक यामुळे बँकिंग उद्योगात एक अनिश्चतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच नवीन खासगी बँका, पेमेंट बँका, स्मॉल फायनान्स बँका यांना दिलेल्या परवान्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंगला कमकुवत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. बड्या उद्योगाकडील थकीत कर्ज याबाबत मात्र अक्षम्य दुर्लक्ष केला जात आहे. ही कर्जे राईट ऑफ किंवा हेअर कटच्या नावाखाली माफ केले जात आहेत. याचाच अर्थ बँकिंग उद्योगातील ज्या प्रश्नांशी कामगार वर्गाने पुकारलेला एल्गार म्हणून हा संप असून, त्यामध्ये आम्ही सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. पोस्टाची कामे आजच करा पोस्टातील खासगीकरण, व्यापारीकरण आणि आऊटसोर्सिंग थांबवे, ५ दिवसीय कामकाजाचा आठवडा करावा यासह पोस्टातील विविध रिक्त पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवावी, या प्रमुख मागण्यांसाठी पोस्ट सेवकांनी पुन्हा संप पुकारला आहे. ग्रामीण पोस्ट सेवकांच्या बेमुदत संपामुळे गेल्या महिन्यात पोस्टात अनेक महत्त्वाची कागदपत्रे धूळखात पडल्याचे दिसून आले होते. पुन्हा संप होत असल्याने पोस्टाची महत्त्वाची कामे ग्राहकांनी सोमवारीच करुन घ्यावी, असे आवाहन पोस्ट सेवकांनी केले आहे. ‘आयटक’ अंतर्गत ८ व ९ जानेवारी सर्व कर्मचारी संघटनांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. यामध्ये पोस्ट सेवकांनी देखील सहभाग घेतला असून, मंगळवारी व बुधवारी पोस्टाचे कामकाज त्यामुळे ठप्प होणार आहे. डिसेंबर महिन्यातच ग्रामीण पोस्ट सेवकांनी पोस्ट बँकेमुळे वाढलेल्या कामाविरोधात आंदोलन केले. या आंदोलनात ग्रामीण पोस्ट सेवकांच्या काही मागण्या पूर्ण झाल्या असून, शहरी व ग्रामीण सेवकांच्या मुख्य मागण्यांसाठी हा दोन दिवसीय संप पुकारण्यात आला आहे. या संपाच्या नियोजनासाठी गेल्या आठवड्यात शहरातील सर्व पोस्ट ऑफिस बाहेर सेवकांनी बैठका घेतल्या. सेवकांच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार ८ व ९ जानेवारी रोजी ग्रामीण, शहरी पोस्ट सेवकांसह पोस्टमन संप करतील. यामध्ये सुमारे ७०० सेवक संपावर जाणार असून, याचा बोजा पोस्टाच्या कामावर येणार आहे. त्यामुळे पोस्टातील महत्त्वाची कामे ग्राहकांनी सोमवारीच करुन घ्यावीत, असे आवाहन पोस्ट सेवकांनी केले आहे. या संपात देशातील सर्व पोस्ट सेवकांचा सहभाग असणार आहे, अशी माहिती संयुक्त समिती वर्ग ३ चे अध्यक्ष म्हणून आशुतोष देशपांडे यांनी दिली. संपाच्या नियोजनात पोस्टमन व एमटीएम. कर्मचारी संघटनेचे सचिव सुभाष दराडे यांसह इतर इतर पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. नियोजनासाठी आज पुन्हा बैठक उद्यापासून असलेला दोन दिवसीय संप यशस्वी व्हावा, यासाठी पोस्ट सेवकांची सोमवारी (७ जानेवारी) रोजी पुन्हा बैठक होणार आहे. सायंकाळी ६ वाजता गंजमाळ सिग्नल येथील मुख्य पोस्ट ऑफिस शेजारील नाशिक प्रधान डाकघर येथे ही बैठक होईल. यासाठी सर्व पोस्ट सेवकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयुक्त कृती समिती तर्फे करण्यात आले आहे.
