उद्धट भाषा आणि मुजोरी यामुळे प्रवासी नेहमीच रिक्षाचालकांना वैतागलेले असतात. रिक्षाचालकांची मुजोरी याची आता लोकांनाही सवयच झाली आहे. मात्र अशावेळी ताहीर या रिक्षाचालकाने सगळेच सारखे नसतात हे सिद्ध करत आमच्यातही प्रामाणिकपणा आणि माणुसकी शिल्लक असल्याचं सिद्ध केलं आहे. ठाण्यातील या 25 वर्षीय रिक्षाचालकाने प्रवाशाचं विसरलेलं पाकिट परत करण्यासाठी मित्र आणि कुटुंबाच्या मदतीने त्या प्रवाशाचा शोध घेतला. त्या पाकिटात प्रवाशाची ओळखपत्रं आणि रोख रक्कम होती.
रात्री 9 वाजण्याच्या सुमारास युकेचे रहिवासी असणारे अनिवासी भारतीय 37 वर्षीय विश्वजीत लिमये यांनी कळवा नाका येथे जाण्यासाठी ठाण्याहून ताहीर यांच्या रिक्षाने प्रवास सुरु केला. त्यांच्यासोबत त्यांची पत्नीदेखील होती. 20 मिनिटांनी विश्वजीत कळवा नाक्याला पोहोचले. रिक्षातून उतरल्यानंतर आपण आपलं पाकिट रिक्षातच विसरलो असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यात 4500 रुपये, बँक कार्ड्स, युकेचा निवास परवाना, आधार आणि पॅन कार्ड होतं.
याचवेळी ताहीर यांना रिक्षात पाकिट सापडलेलं होतं. पण विश्वजीत यांच्यापर्यंत पोहचायचं कसं हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे होता. ताहीर यांनी घरी जाऊन आपल्या वडिलांकडे मदत मागितली. त्यांनी त्यांचा ओळखीचे जितेंद्र जैस्वाल यांची मदत घेण्यास सांगितलं.
फोन टेक्निशिअन असणाऱ्या जितेंद्र यांनी ऑनलाइन विश्वजीत यांचा संपर्क क्रमांक शोधण्याचा प्रयत्न केला. ताहीर यांच्याकडे इंटरनेट नसल्याने जितेंद्र यांनी किमान तासभर फेसबुकवर विश्वजीत यांना सर्च केलं. पण काही फायदा झाला नाही. यानंतर आधार कार्डवर असणाऱ्या क्रमांकावरही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तिथेही काही उत्तर मिळालं नाही.
अखेर एका अॅपच्या सहाय्याने ताहीर आणि जितेंद्र यांना विश्वजीत यांचा ई-मेल आयडी सापडला. दुसरीकडे विश्वजीत यांनी आपलं पाकिट परत मिळण्याच्या सर्व आशा सोडल्या होत्या. सात तासांनी ई-मेल लॉग इन केलं तेव्हा मात्र त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. तुमची कागदपत्रं आणि पाकिट आमच्याकडे सुरक्षित असल्याचं मेलमध्ये लिहिलं होतं.
विश्वजीत आणि ताहीर यांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले आणि त्याचदिवशी भेट घेतली. महत्त्वाचं म्हणजे पाकिट परत दिल्यानंतर विश्वजीत यांनी दिलेलं बक्षिस ताहीर यांनी नाकारलं. हे आपलं कर्तव्य होतं असं उत्तर त्यांनी दिलं.
