शबरीमलाची परंपरा खंडित; दोन महिलांनी घेतले दर्शन

केरळमधील शबरीमला  मंदिराची शेकडो वर्षांची परंपरा अखेर खंडित झाली. दोन महिलांनी पोलीस बंदोबस्तात भगवान अयप्पा यांचे दर्शन घेतले असून त्याचा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. मागील वर्षी सुप्रीम कोर्टाने शबरीमला मंदिरात १० ते ५० या वयोगटातील महिलांना असलेली बंदी उठवली होती.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर केरळमध्ये भाजपसह हिंदूत्ववादी संघटनांनी महिलांच्या मंदिर प्रवेशाला विरोध केला होता. मंदिर प्रवेशाला होणाऱ्या विरोधानंतरही काही महिलांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आंदोलकांच्या अटकावामुळे पोलीस बंदोबस्तातही त्यांना दर्शन घेता आले नव्हते. अखेर बिंदू आणि कनकदुर्गा या दोन महिलांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास भगवान अयप्पा यांचे दर्शन घेण्यात यश मिळाले. या दोन महिलांसोबत पोलीसदेखील होते. दर्शन घेतल्यानंतर या महिला कुठे गेल्या याची माहिती सुरक्षेच्या कारणास्तव गुप्त ठेवण्यात आली. या दोन्ही महिलांचे वय ४० पेक्षा कमी असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *