आईला मारणाऱ्या मुलास जन्मठेप

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून जन्मदात्या आईचा हत्या करणाऱ्या नराधमास जिल्हा कोर्टाने बुधवारी जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. हा खटला जिल्हा न्यायाधीश एस. एस. नायर यांच्या कोर्टात सुरू होता.

अशोक लक्ष्मण वटाणे (२७, रा. टिटवे, ता. दिंडोरी) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी वणी पोलिस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. दिंडोरी तालुक्यातील टिटवे येथील बेघर वस्तीत नात्याला काळीमा फासणारी घटना घडली होती. या ठिकाणी शांताबाई लक्ष्मण वाटाणे या आरोपी मुलगा अशोक आणि सुनासह राहत होत्या. अशोकला दारू पिण्याचे व्यसन होते. कामधंदा न करता सतत आईकडून पैसे मागणाऱ्या अशोकला याचमुळे पत्नीही सोडून गेली होती. अशोकने १५ एप्रिल २०१५ रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास आईकडे दारुसाठी पैसे मागितले. आईने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे चिडलेल्या अशोकने घरातील चूल फुंकण्यासाठी वापरली जाणारी फुंकणी व लाकडी ठोकळ्याने शांताबाईच्या डोक्यावर प्रहार करून केला. यात वर्मी घाव बसलेल्या शांताबाई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. या प्रकरणी काशिनाथ नथू पवार (रा. टिटवे, ता. दिंडोरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वणी पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्याची नोंद केली. या खुनाचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक एम़. डी. खोडवे यांनी केला. सरकारपक्षातर्फे अॅड. विद्या जाधव यांनी सात साक्षीदार तपासून पोलिसांनी जमा केलेले परिस्थितीजन्य पुरावे सादर केले. या आधारे कोर्टाने अशोकला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *